भगव्या जर्सीमुळेच भारताचा पराभव- मेहबूबा मुफ्ती

जर्सीचं राजकारण? 

Updated: Jul 1, 2019, 08:09 AM IST
भगव्या जर्सीमुळेच भारताचा पराभव- मेहबूबा मुफ्ती  title=

श्रीनगर : रविवारी क्रिकेट विश्वचषकादरम्यान खेळलल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याची उत्कंठा एका क्षणाला वाढली होती. पण, अखेर सुरुवातीपासूनच इंग्लंडची या सामन्यावर असणारी पकड इतकी घट्ट ठरली, की यजमानांनी भारतीय क्रिकेट संघाचा ३१ धावांनी पराभव केला.

यंदाच्या विश्वचषक मालिकेतील भारतीय संघाचा हा पहिलाच पराभव होता. ज्यामुळे क्रीडा रसिकांची निराशा झाली. जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही या पराभवाचं एक वेगळंच कारण ट्विट करत सर्वांसमोर माडलं. 

रविवारी पार पडलेल्या क्रिकेट सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने भगव्या आणि गडद निळ्या रंगाची सांगड घातलेल्या जर्सीला प्राधान्य दिलं होतं. सुरुवातीपासूनच जर्सीच्या रंगावरुन बऱ्याच राजकीय चर्चांना वळण आलं होतं. त्यातच मुफ्ती यांच्या ट्विटने या चर्चांना एक वेगळं वळण दिलं. 

भारतीय क्रिकेट संघाचा पहिलाच पराभव झाल्यानंतर मुफ्ती यांनी ट्विट करत लिहिलं, 'तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणा.... पण, भगव्या जर्सीमुळेच विश्वचषकामद्ये भारताचा विजय रथ रोखला गेला आहे'. मुफ्ती यांचा निशाणा नेमका भगव्या जर्सीसोबतही आणखी कोणत्या गोष्टीकडे होता हे त्याच जाणतात. पण, त्यांचं हे ट्विट चर्चांना हवा देऊन गेलं असं म्हणायला हरकत नाही. 

भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना सुरु असतानाही त्यांनी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी क्रिकेट रसिक भारताला पाठिंबा देत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. 'काही का असेना पण, क्रिकेटच्या निमित्ताने दोन्ही देशांने विचार एकसमान आहेत', असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं होतं. त्यामुळे एकंदरच क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने राजकीय वर्तुळातही अनेक घडामोडी आणि हालचाली पाहायला मिळाल्या हे नाकारता येणार नाही. 

#TeamIndia #CWC19  #ENGvIND #Cricket२४तास