'ये नया पाकिस्तान है'; इम्रान खान यांना भारताचे प्रत्युत्तर

पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताने आमचे विमान पाडलेच नाही, असा पवित्रा घेतला आहे.

Updated: Mar 9, 2019, 12:16 PM IST
'ये नया पाकिस्तान है'; इम्रान खान यांना भारताचे प्रत्युत्तर title=

नवी दिल्ली: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या म्हणण्याप्रमाणे 'ये नया पाकिस्तान है, हमारी सोच नयी है', अशी परिस्थिती खरंच असेल तर ते त्यांच्या कृतीमधून का दिसत नाही, असा सवाल भारताने उपस्थित केला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेले अनेक दावे खोडून काढले. 'ये नया पाकिस्तान है, हमारी सोच भी नयी है', हा पाकिस्तानचा दावा खरा असेल तर त्यांनी आपल्या कृतीमधून ते दाखवून द्यायला हवे. त्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद आणि सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीच्या विरोधात नव्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे, असे रवीश कुमार यांनी म्हटले. 

तसेच पाकिस्तानने भारताविरोधात एफ-१६ विमानाचा वापर करण्यात आल्याच्या दाव्याचेही ठामपणे समर्थन केले. अनेकांनी ही विमाने पाहिली आहेत. तसेच एफ-१६ विमानांचे इलेक्ट्रॉनिक पुरावेही आमच्यापाशी असल्याचे रवीश यांनी म्हटले. याशिवाय, भारताचे आणखी एक विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. पाकिस्तानकडे त्याचा व्हीडिओ असेल तर तो प्रसिद्ध का केला जात नाही, असा सवालही रवीश यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. 

भारतीय वायूदलाच्या एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. मात्र, भारतीय विमानांनी हे एफ-१६ पाडले होते. परंतु विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी पाकिस्तानी हद्दीत पोहोचले होते. तर या विमानातील वैमानिक पॅराशुटच्या सहाय्याने बाहेर पडला होता. परंतु, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताने आमचे विमान पाडलेच नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी या एफ-१६ विमानाची छायाचित्रे समोर आली होती. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी दुर्घटनाग्रस्त एफ-१६ विमानाच्या अवशेषांची पाहणी करताना दिसत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झाली होती.