IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट

IMD Weather Alert:  हवामानात बदल होत असल्याने फेब्रवारी महिन्यातच घामाच्या धारा लागल्या असून उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस तापमानात वाढ होईल असा अलर्ट दिला आहे. 

Updated: Feb 21, 2023, 06:28 PM IST
IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट title=

IMD Weather Alert: संपूर्ण देशभरात सध्या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असून आतापासूनच उन्हाळा सुरु झाल्याची स्थिती आहे. अंगातून घामाच्या धारा निघत असून उष्णता अजून वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीप्रमाणे मार्च महिन्यातही स्थिती कायम असेल असा अलर्ट हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हवामान तज्ज्ञ महेश पलावत (Mahesh Palawat) यांनी यावेळी उन्हाळा लवकर सुरु झाल्याचं म्हटलं आहे. पर्वतांमध्ये कमी बर्फवृष्टी झाली असल्याने हे घडत आहे. तसंच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे डोंगरावरून येणारे थंड वारेही थांबले आहेत. मात्र, उत्तर भारतातील या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा दिल्लीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तर नैऋत्येकडून गरम हवा सतत येत असते, ज्यामुळे उष्णता वाढत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुजरात, राजस्थान, गोवा आणि कर्नाटकमधील किनाऱ्यालगत असणाऱ्या भागात तापमान 35 ते 39 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत हे तापमान 4 ते 5 डिग्री जास्त आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडबद्दल बोलायचं झाल्यास येथे तापमान 23 ते 28 डिग्रीपर्यंत आहे. तर पंजाब, दिल्ली आणि हरियाणातील तापमान 28 ते 33 डिग्रीपर्यंत आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये पुढील तीन दिवस कमाल तापमान 5 ते 7 डिग्री जास्त असणार आहे. तापमानात होणारी वाढ पाहता पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवस गव्हाच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं असाही अलर्ट आहे.

शेतकऱ्यांसाठी अलर्ट

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी सूचना जारी केल्या आहेत. पीक वाचवण्यासाठी थोड्या प्रमाणात पिकांचं सिंचन करावं असा सल्ला देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात उष्णतेची लाट?

हवामान विभागाने रविवारी महाराष्ट्रातील काही भाग तसंच कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. हवामान विभागाने नंतर हा अलर्ट मागे घेतला होता. तसंच सोमवारी रात्री हवामान विभागाने प्रेस रिलीज जाहीर करत या भागांमध्ये तापमान किमान 4 ते 9 डिग्री जास्त असल्याचं सांगितलं होतं. 

फेब्रुवारीत इतकी उष्णता का?

उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णता प्रचंड वाढली असून तापमानाचे रेकॉर्ड मोडले जात आहेत. दिल्लीत फेब्रुवारी महिन्यातच तापमान 33 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत हे 7 डिग्री अधिक आहे. 

सामान्यपणे फेब्रुवारी महिन्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स पाहायला मिळतो. ज्यामुळे पाऊस पडतो आणि तापमानही वाढत नाही. पण यावर्षी वेस्टर्न डिस्टर्बन्सची तीव्रता कमी आहे. ज्याचा परिणाम तापमानात वाढ होत आहे. 

महेश पलावत यांच्या म्हणण्यानुसार, जर पर्वतभागात बर्फवृष्टी झाली असती तर उत्तरेकडून येणारे वारेही थंड असते. पण सध्या या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. मार्च महिन्यातही प्रचंड उष्णता असणार आहे. एल नीनो (El Nino) इफेक्टमुळे यावेळी पाऊसही कमी असेल अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.