Ind vs NZ T20 : टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या या टी-20 मालिकेसाठी अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून अनेक युवा खेळाडूंना या संधी मिळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू नसताना हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.
टीम इंडिया विजयाने मालिकेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताकडून शुभमन गिल आणि इशान किशन ओपनिंग करु शकतात. न्यूझीलंडविरुद्ध गिलला प्रथमच भारतीय टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे, तर इशान किशन हा टी-20 विश्वचषक संघाचा भाग नव्हता परंतु त्याआधी तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. केएल राहुल आणि रोहितच्या अनुपस्थितीत तो सलामीसाठी पहिली पसंती असेल.
श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. कर्णधार हार्दिक पंड्या पाचव्या तर ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. संघात वॉशिंग्टन सुंदरचे पुनरागमन होऊ शकते, जो एक उत्कृष्ट फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे, तर युझवेंद्र चहल हा स्पिनर म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज संघात असू शकतात.
शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज.