मोदींची मोठी घोषणा; लष्कराच्या तिन्ही दलांचे नेतृत्त्व एकाच व्यक्तीकडे

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाल संबोधित करणार आहेत.

Updated: Aug 15, 2019, 09:44 AM IST
 मोदींची मोठी घोषणा; लष्कराच्या तिन्ही दलांचे नेतृत्त्व एकाच व्यक्तीकडे title=

नवी दिल्ली: देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अनुच्छेद ३७०, तिहेरी तलाक, अर्थव्यवस्था, गरीबी निर्मुलन, 'एक देश, एक निवडणूक' अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान म्हणून त्यांनी सलग सहाव्यांदा लाल  किल्ल्यावरून देशाल संबोधित केले.  त्यामुळे नरेंद्र मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताच्या इतिहासात अशाप्रकारचा मान मिळालेले ते दुसरे बिगरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत.

आजच्या भाषणार नरेंद्र मोदी यांनी राजकीय स्थैर्यामुळे देशाला विकासाची मोठी संधी असल्याचे सांगितले. देशातील सर्व लहानसहान घटकांनी एकत्र मिळून काम केले तर ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न भारताला नक्की गाठता येईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. यासाठी आगामी काळात सरकार आधुनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. 

तसेच देशाच्या संरक्षणाच्यादृष्टीने तिन्ही सैन्यदलांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती केली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही मोदींनी केली.

यावेळी मोदींनी गेल्या ७० दिवसांमध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. तसेच आगामी काळात देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे संकेतही मोदींनी यावेळी दिले. गेल्या पाच वर्षांमध्ये मी प्रत्येक दिवशी गरज नसलेला एक कायदा संपुष्टात आणला. याची आकडेवारी पाहायची झाल्यास आपण १४५० कायदे रद्द केल्याचे मोदींनी सांगितले.

 तसेच आगामी काळात सरकार गरिबी निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न करेल. त्यासाठी 'जलजीवन' योजना आणि इज ऑफ लिव्हिंग वाढवण्यावर सरकारचा भर असेल, असे मोदींनी सांगितले. 

मोदींच्या  भाषणातील ठळक मुद्दे

* आपण रासायनिक खतांचा वापर २० ते २५ टक्क्यांनी केला तर मोठी देशसेवा होईल- मोदी
* शेतीमध्ये किटकनाशकांचा अतिवापर करून आपण जमिनीचा ऱ्हास करतोय- मोदी
* २०२२ पर्यंत देशातील किमान १५ पर्यटन स्थळांना भेट द्या; मोदींचे देशवासियांना आव्हान
* तुम्ही दुर्गम ठिकाणी गेलात तरच त्या भागात पर्यटन सुविधा विकसित होतील- मोदी
* काहीवेळा अवघड परिस्थितीचा सामना करणेही चांगले असते- मोदी
* आपण दुर्गम भागात गेलो तरच जगातील लोकही त्या पर्यटनस्थळांना भेटी देतील- मोदी
* आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्या- मोदी
* उज्ज्वल भविष्यासाठी स्थानिक उत्पादनांच्या निर्मितीला प्राधान्य द्या- मोदी
* सणाच्या दिवशी एकमेकांना कापडाच्या पिशव्या भेट द्या- मोदी
* प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करण्याची गरज- मोदी
* प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक स्तरावर यंत्रणा निर्माण करण्याची गरज- मोदी
* देश प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मोदींचे नागरिकांना आवाहन- मोदी
* तिन्ही दलांचे नेतृत्त्व करणाऱ्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (संरक्षण प्रमुख)  या स्वतंत्र पदाची निर्मिती करणार- मोदी
* भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचा एकत्रितपणे विकास झाला पाहिजे- मोदी
* देशातील सुरक्षादलांनी शौर्य गाजवले आहे- मोदी
* दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ताकदींचा बुरखा फाडण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत- मोदी
* वैश्विक शांततेसाठी भारताला प्रयत्न करावे लागतील- मोदी
* मोदींकडून देशातील उद्योजकांना पाठिंबा आणि आदर देण्याचे आवाहन- मोदी
* संपत्तीनिर्मिती झाली नाही तर संपत्तीवाटप होणार नाही- मोदी
* देशात संपत्तीनिर्मिती करणाऱ्यांचा उचित आदर ठेवला पाहिजे- मोदी
* आमच्या सरकारने विकासही केला आणि महागाईही आटोक्यात ठेवली- मोदी
* देशात राजकीय स्थैर्य असल्यामुळे व्यवसायाची मोठी संधी- मोदी
* आर्थिक वृद्धीसाठी देशात अत्यंत अनुकूल वातावरण- मोदी
* पर्यटन क्षेत्राचा विकास आणखी वेगाने झाला पाहिजे- मोदी
* अर्थव्यवस्थेचा विकास झाला तर प्रत्येक घटकाच्या विकासाच्या संधी निर्माण होतात-मोदी
* मोठी स्वप्न बघायलाच पाहिजेत- मोदी
* देशातील सर्व लहान घटकांनी मिळून एकत्र काम केले तर ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था शक्य- मोदी
* मात्र, आता आपण सर्वजण मिळून देशासाठी काय करू शकतो, असा विचार झाला पाहिजे- मोदी
* आतापर्यंत सरकारने एखाद्या प्रदेशासाठी, समाजासाठी काय केले यावर मूल्यमापन व्हायचे.
* आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी १०० लाख कोटी खर्च करणार- मोदी
* देश पुढे गेला पाहिजे पण इन्क्रिमेंटल ग्रोथ महत्त्वाची- मोदी
* देशात 'इज ऑफ लिव्हिंग' वाढवणे हे माझे उद्दिष्ट- मोदी
* गेल्या पाच वर्षांमध्ये मी प्रत्येक दिवसाला एक अशाप्रकारे गरज नसलेले कायदे संपुष्टात आणले, एकूण १४५० कायदे रद्द
* 'सरकारचा दबावही नसेल, अभावही नसेल' अशी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे- मोदी
* सरकार नागरिकांच्या जीवनातील हस्तक्षेप करू शकत नाही का?- मोदी
* आपण अस्वस्थ, अशिक्षित अशक्त समाज निर्माण करू शकत नाही- मोदी
* लोकसंख्यावाढीच्या समस्येचा गांभीर्याने विचार झालाच पाहिजे- मोदी
* अपत्य जन्माला घालण्यापूर्वी विचार करा, समाजाच्या भरवश्यावर राहू नका- मोदी
* कुटुंबनियोजनाचा विचार हीदेखील देशभक्ती- मोदी
* मात्र, देशातील एका वर्गाला लोकसंख्यावाढीच्या संकटाची जाणीव, आपण अपत्याला सर्व सुविधा देऊ शकतो का, याचा विचार ते करतात- मोदी
* वाढती लोकसंख्या देशातील आगामी पिढ्यांसाठी संकट- मोदी

* जलसंकट दूर करण्यासाठी गेल्या ७० वर्षांपेक्षा अधिक वेगाने प्रयत्न केले पाहिजेत- मोदी 
* मोदींकडून जलजीवन योजनेची घोषणा; ३.५ लाख कोटींची तरतूद
* देशातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी कसे पोहोचेल, यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे- मोदी
* आजपर्यंत प्रत्येक सरकारने गरिबी निर्मुलनासाठी प्रयत्न केले. मात्र,  आजही देशातील अनेक घरांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. 
* गरीब जनतेमध्ये प्रतिकुल परिस्थितीचा सामना करण्याचे अधिक सामर्थ्य- मोदी
* गरिबांचा स्वाभिमान जागृत झाला तर ते बदलासाठी सरकारची वाट पाहणार नाहीत- मोदी
* गेल्या पाच वर्षांमध्ये गरिबीच्या उच्चाटनासाठी वेगाने प्रयत्न झाले- मोदी
* भारताला जगात स्वत:चे स्थान निर्माण करायचे असेल तर गरिबीपासून मुक्तता मिळाली पाहिजे- मोदी
* आता 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा झालीच पाहिजे.
* देशाचा एकोपा वाढवणारे निर्णय घेतले पाहिजेत.
* आज प्रत्येक भारतीय एक देश, एक संविधान हे गर्वाने म्हणू शकतो- मोदी
* अनुच्छेद ३७० इतका चांगला होता तर गेल्या ७० वर्षात बहुमत असणाऱ्या राजकीय पक्षांनी हा अनुच्छेद कायमस्वरुपी का केला नाही?
* अनुच्छेद ३७० चे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षांना मोदींचा सवाल
* मी स्वत:साठी नव्हे तर तुमच्यासाठी काम करण्यासाठी पंतप्रधानपदी आहे- मोदी
* अनुच्छेद ३७० रद्द व्हावे, सगळ्यांनाच वाटत होते, पण कोणी निर्णय घेण्यास धजावत नव्हते
* नवे सरकार सत्तेत आल्यानंतर अनुच्छेद ३७० रद्द करण्यासाठी विधेयक मंजूर करवून घेतले- मोदी
* आम्ही समस्यांना टाळत नाही आणि त्या अस्तित्त्वातही ठेवत नाही- मोदी
* तिहेरी तलाकच्या निर्णयाकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका.
* आपण सतीप्रथा, भृणहत्या आणि हुंड्याची प्रथा बंद करू शकतो तर तिहेरी तलाकचे उच्चाटन का करू शकत नाही?- मोदी
* मात्र, २०१९ मध्ये नागरिकांच्या मनात देश बदलू शकतो, ही भावना निर्माण झाली आहे.
* २०१४ साली मी देशवासियांसाठी नवीन होतो. त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर निराशा होती. लोकांना देश खरंच बदलू शकतो, का याविषयी साशंकता होती.
* सरकारने लहान व्यापाऱ्यांसाठी निवृत्तीवेतनासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. 

* अवघ्या दहा आठवड्यांमध्ये नव्या सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७०, कलम ३५ अ रद्द करणे आणि तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 
* पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरकार प्रत्येक क्षेत्रात कोणताही विलंब न करता पूर्ण सामर्थ्य आणि समर्पणाने देशाची सेवा करत आहे.
* भारत स्वतंत्र झाल्यानंतर विकास, शांती आणि स्थैर्यासाठी झटणाऱ्या लोकांना अभिवादन करतो.
* देशासाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन करतो.

* आज देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांना फटका बसला आहे.

लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात

* पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल