लडाखमध्ये साकारला आणखी एक चमत्कार; साऱ्या जगाचीच यावर नजर

देशातील आणि जगभरातील अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं एक ठिकाण म्हणजे लडाख

Updated: Aug 4, 2021, 08:28 PM IST
लडाखमध्ये साकारला आणखी एक चमत्कार; साऱ्या जगाचीच यावर नजर
लडाख

लेह : देशातील आणि जगभरातील अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं एक ठिकाण म्हणजे लडाख. प्रवास, भौगोलिक अभ्यास, आत्मचिंतन आणि बरंच काही इथं येऊन साध्य केलं जातं. अशा या लडाखमध्ये सध्या एक अशी बाब आकारास आली आहे ज्याकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे. 

'द बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन' अर्थात,  Border Roads Organisation (BRO) नं लडाखमध्ये जगातील सर्वाधिक उंचीवर असणारा आणि मोटरसायकलने पोहोचता येणारा रस्ता बांधला आहे. ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 19300 इतकी आहे. पूर्व लडाखमधील उमलिंग्ला पास येथे हा रस्ता बांधण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयानं बुधवारी (4 जुलै) यासंदर्भातील माहिती दिली. 

' Border Roads Organisation (BRO) नं 52 किमी अंतराता रस्ता उमलिंग्ला पास येथून जाणाऱ्या भागात बांधला आहे', असं लिहित बोलिविया येथील 18953 फूट इतक्या उंचीवर असणाऱ्या रस्त्याचा विक्रम लडाखमधील या नव्या रस्त्यानं मोडल्याची माहिती प्रसिद्धीरपत्रकातून देण्यात आली. 

Umlingla Pass येथून जाणारा हा रस्ता पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या छूमर सेक्टरमधील दोन मुख्य गावांना जोडतो. स्थानिकांच्या दृष्टीनं हा रस्ता एक वरदानच ठरणार आहे. चिसुमले आणि डेमचोकला लेहशी  जोडणारा हा थेट पर्यायी रस्ता असेल. यामुळं पर्यटनामध्येही वाढ होणार आहे. 

लडाखमध्ये हा नवा रस्ता बांधण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये तापमान उणे 40 अंश सेल्शिअस इतकं खाली येतं. तर, सर्वसाधारण ठिकाणांपेक्षा समुद्रसपाटीपासून 19300 फूटांच्या उंचीवर असणाऱ्या या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण हे 50 टक्क्यांहून कमी असतं, असंही सांगण्यात आलं आहे.