India China News : चीन काही केल्या कुरापती थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचंच पाहायला मिळत आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न असो किंवा मग आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्षेपार्ह वक्तव्य असो. वारंवार भारताचा डिवचणाऱ्या चीननं पुन्हा एक मोठं पाऊल उचललं आहे, ज्यामुळं नवा वाद पेटू शकतो. (India China News China has Givan Name To Arunachal Pradeshs 11 Places)
नुकतंच चीन सरकारच्या संकेतस्थळावर एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, या यादीत अरुणाचल प्रदेशावर दावा करण्याच्या हेतूनं भारतातील काही गावांसाठी चीनी, तिबेटियन आणि पिनयिन भाषेतील नावांची एक यादी प्रसिद्ध केली आहे.
'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना'नं रविवारी म्हणजेच 1 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नवी नावं जारी केली. ज्यांचा उल्लेख चीनच्या भौगोलिक नावांच्या नियमांनुसार तिबेटचा दक्षिणेकडील भाग जंगनान, असा करण्यात आला आहे.
इथं चीनच्या ग्लोबल टाईम्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार तेथील सरकारी मंत्रालयाकडून 11 जागांची अधिकृत नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन भूमी क्षेत्र, दोन आदिवासी क्षेत्र, पाच पर्वतशिखरं आणि दोन नद्यांचा समावेश आहे.
चीनच्या मंत्रालयाकडून अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांच्या भौगोलिक नावांची यादी जाहीर करण्याची ही पहिली वेळ नाही, याआधी 2017 मध्ये अरुणाचलमधील 6 जागांच्या नावांची ( Standardised Names)यादी 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तर, यानंतर 2021 मध्ये 15 नावांची दुसरी यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती.
चीननं अरुणाचल प्रदेशातील गावांना आणि काही ठिकाणांना दिलेली नावं पाहता भारताकडून त्यांचा हा दावा उधळून लावण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता आणि यापुढेही कायम राहील असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
उलटपक्षी आपली भूमिका ग्राह्य असल्याचं म्हणत चीननं हा आपला हक्कच असल्याचं म्हटलं. 2017 मध्ये तिबेटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्यानंतर चीननं वरील यादी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी दलाई लामा यांच्या दौऱ्यावर चीनकडून टीकाही करण्यात आली होती. दलाई लामा अरुणाचल प्रदेशातील तवांग मार्गे तिबेटमध्ये आले होते. 1950 मध्ये तिबेटवर चीनची सत्ता आल्यानंतर 1959 मध्ये त्यांनी भारतात शरण घेतली होती.