नवी दिल्ली: लडाख परिसरातील चीनकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात सध्या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्यास भारताला लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे, असे वक्तव्य संरक्षण दलांचे प्रमुख CDS बिपीन रावत यांनी व्यक्त केले. एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने बोलणी सुरु आहेत. मात्र, लडाखच्या अनेक भागांमध्ये भारतीय हद्दीतील सैन्य मागे घेण्यास चीन अद्याप तयार नाही.
या पार्श्वभूमीवर बिपीन रावत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे. त्यांनी म्हटले की, लडाखमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीसंदर्भातील मुद्दा लष्करी चर्चा किंवा राजनैतिक पातळीवर न सुटल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय सैन्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.
जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. पँगाँग तलावाच्या परिसरात असणाऱ्या फिंगर ५ परिसरात चीनने मोठ्याप्रमाणावर सैन्य आणि युद्धसामुग्री तैनात केली आहे. चिनी सैन्याने या भागातून निघून जावे, अशी मागणी भारतीय सैन्याने वारंवार केली आहे. यापूर्वी भारतीय सैन्य पँगाँग तलावाच्या परिसरातील फिंगर ८ हद्दीपर्यंत गस्त घालत होता. मात्र, आम्ही सैन्य माघारी घेतल्यास भारतानेही फिंगर १ पर्यंत मागे जावे, अशी आडमुठी भूमिका चीनने घेतली आहे. मात्र, भारताकडून स्पष्ट शब्दांत ही मागणी धुडकावून लावण्यात आली आहे.