नवी दिल्ली: काश्मीर प्रश्नावरून भारताला डिवचणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना परराष्ट्र खात्याने चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. इम्रान खान यांनी सोमवारी ट्विट करून काश्मीरमधील परिस्थितीवर टिप्पणी केली होती. भारतीय लष्कराकडून निष्पाप काश्मिरींच्या होणाऱ्या कत्तलीचा मी निषेध करतो. काश्मीर प्रश्न हा आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्तरावर सोडवायला पाहिजे, याची जाणीव भारताला झाली पाहिजे, असा सल्लाही इम्रान खान यांनी दिला होता.
इम्रान खान यांच्या ट्विटला परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्यापेक्षा स्वत:च्या देशात काय सुरु आहे, ते पाहावे.
एकीकडे चर्चेची तयारी दाखवायची आणि दुसरीकडे दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे, ही पाकिस्तानची दुटप्पी भूमिका जगासमोर आली आहे. पाकिस्तानला काश्मीरमधील लोकांची खरंच इतकी फिकीर वाटत असेल तर त्यांनी दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्याऐवजी त्यांच्या कारवायांना पायबंद घालावा, असे रवीश कुमार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
भारताकडून पाकिस्तानी पंतप्रधानांना थेट लक्ष्य करण्याची ही दुसरी वेळ आहे. काही महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर चर्चा होणार होती. मात्र, सीमारेषेवर पाकिस्ताकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारण देत भारताने या चर्चेतून माघार घेतली होती. त्यावेळीही भारताने इम्रान खान यांच्या नावाचा उल्लेख करत पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते.