राजनैतिक अधिकाऱ्यांची हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानचा भारताकडून निषेध

भारतीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापर्यंत केला जात होता पाठलाग....   

Updated: Mar 19, 2019, 08:09 AM IST
राजनैतिक अधिकाऱ्यांची हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानचा भारताकडून निषेध  title=

नवी दिल्ली : इस्लामाबादमध्ये असणाऱ्या भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना विविध मार्गांनी सतावत त्यांची हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानचा भारताकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. सोमवारी पाकिस्तानविरोधात तोंडी तक्रार करत या प्रकरणी तातडीने तपास करत निष्कर्ष हाती देण्याची मागणीही भारताकडून करण्यात आली आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं. मार्च महिन्यातील काही घडामोडींच्या आधारावर पाकिस्तानला भारताने खडसावलं आहे. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयापुढे ही बाब ठेवण्यात आली. पाकिस्तानमध्ये भारत सरकारच्या सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारचा दोन व्यक्तींक़डून दररोज पाठलाग करण्यात येत असल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे. ८ मार्च ते ११ मार्चदरम्यान, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कारचा सतत पाठलाग करण्यात आला होता. इतकच नव्हे तर त्यांच्यावर सतत नजर ठेवत पाकिस्तानची हेरगिरीही सुरू होती. 

पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणांशी संबंधित या व्यक्ती भारतीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना फितवून त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेण्याच्या प्रयत्नान असल्याचं उघड झालं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरू असणाऱ्या तणावाच्या वातावरणातच ८ मार्चला पाकिस्तानस्थित एका भारतीय अधिकाऱ्याचा बँकमध्ये जाताना पावलोपावली पाठलाग करण्यात आला होता. त्याच दिवशी भारतीय आणखी एका अधिकाऱ्याचा बाईकस्वाराने थेट त्यांच्या निवासस्थानापर्यंत पाठलाग केला होता. दुसऱ्या दिवशीही अधिकाऱ्यांचा पाठलाग करण्याचं हे सत्र सुरू होतं. याशिवाय इस्लामाबाद येथे असणाऱ्या भारतीय उच्चाधिकाऱ्यांना काही फसवे फोनही गेल्या दोन दिवसांपासून करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पाकिस्तान सरकारची ही भूमिका पाहता भारताकडून त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून उचलण्यात आलेली ही पावलं व्हिएना तहातील राजनैतिक नात्य़ांविषयी नमूद केलेल्या गोष्टींचा भंग करत असल्याचं म्हणत, भारताने नाराजी व्यक्त केली. सोबतच पाकिस्तानमध्ये सध्याच्या घडीला उपस्थित असणाऱ्या भारताच्या सर्व राजनैतिक अधिकाऱ्यांची आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी ही पाकिस्तान सरकारची असल्याची आठवणही करुन देण्यात आली आहे.