जम्मू-काश्मीर: फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान, म्हणाले 'दोन्ही बाजूंनी चालतो गोळीबार'

अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 6, 2018, 03:30 PM IST
जम्मू-काश्मीर: फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान, म्हणाले 'दोन्ही बाजूंनी चालतो गोळीबार' title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्ताकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान आणि चार सैनिकांना विरमरण आले. या पार्श्वभूमीवर बोलताना फारूक अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत.

युद्धाच्या मार्गाने काश्मीरची परिस्थिती सुधारणार नाही

पुढे बोलताना अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, जम्मू काश्मीरमधील स्थिती दिवसेंदिवस बिगडत चालली आहे. त्यामुळे युद्धसदृश्य स्थिती बनत चालली आहे. इतकी की पंचायत निवडणुकाही रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागत आहेत. युद्धाच्या मार्गाने काश्मीरमधली परिस्थिती कधीच सुधारणार नाही. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करायला पाहिजे. अब्दुल्ला असेही म्हणाले की, कारगिर युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानला चर्चेसाठी बोलवले होते.

या आधीही अब्दुलांनी केली आहेत वादग्रस्त विधाने

वादग्रस्त विधान करण्याची अब्दुल्ला यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा अब्दुल्ला यांनी वादग्रस्थ विधानं केली आहेत. गेल्या वर्षी २३ डिसेंबरलाही त्यांनी म्हटले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:हून पाकिस्तानला गेले होते. तेव्हा त्यांच्या विरोधात कोणी षडयंत्र रचले होते? असा सवाल अब्दुल्ला यांनी विचारला होता. तसेच, पाकिस्तान कोणतेच षडयंत्र करत नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग कधीच असू शकत नाही, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले होते.