मुंबई : जगभरात कोरोनाचा संसर्ग थैमान घालत आहे. कोट्यवधी लोकांचे प्राण एका विषाणूने घेतले आहेत. अद्यापही या संसर्गाने पाठ फिरवली नाही. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. परंतू भारताने या आणीबाणीच्या परिस्थितीतही जगभरात औषधं पुरवण्याचं काम केलं आहे. जगासाठी भारत वेश्विक फार्मसी बनला आहे.
97 देशांना दिली कोरोनाप्रतिबंधक लस
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने मागील वर्षी 31 डिसेंबरपर्यंत जगातील 97 देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पाठवली आहे. भारताने 16 जानेवारी 2021 पासून नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले होते. त्याच दिवसांपासून मित्रराष्ट्रांनाही भारताने लस देणे सुरू केले होते.
आपल्या शेजारी राष्ट्रांसह भारताने अन्य गरीब देशांना अनुदानच्या स्वरूपात लसी उपलब्ध करून दिल्या. तर काही समर्थ देशांना लसींची विक्री केली.
सर्वात जास्त बांग्लादेशला 2.25 कोटी डोस
भारताने सर्वात जास्त बांग्लादेशला 2.25 कोटी आणि म्यानमारला 1.86 कोटी डोस दिले आहेत. तसेच नेपालला 94.99 लाख, इंडोनेशियाला 90 लाख, अफगानिस्तानला 14 लाख, श्रीलंकेला 12.64 लाख, भूटानला 5.5 लाख आणि मालदिवला 3.12 लाख डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वॉशिंगटन डीसीतील पीटीएचमधील इम्यूनोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे वैज्ञानिक निर्देशक डॉ. कुतूब महमूद यांनी म्हटलं की, वाढत्या लसीकरणामुळे आपण लवकरच या विषाणूच्या संसर्गातून बाहेर येऊ.
आपल्याला बुस्टर डोसदेखील घ्यावा लागू शकतो. दरम्यान, भारताने बनवलेल्या लसी वैश्विक स्तरावर उपयोगात आणल्या जात आहेत.या आणिबाणीच्या काळात ही मोठी बाब आहे.