३ लाख युवकांना ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठवणार मोदी सरकार

भारतातील तीन लाख तरुणांना तीन ते पाच वर्षांच्या ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठविण्यात येणार आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 12, 2017, 01:18 PM IST
३ लाख युवकांना ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठवणार मोदी सरकार title=
File Photo

नवी दिल्ली : भारतातील तीन लाख तरुणांना तीन ते पाच वर्षांच्या ट्रेनिंगसाठी जपानमध्ये पाठविण्यात येणार आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत केंद्र सरकार तीन लाख युवकांना जपानमध्ये पाठवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

भारतीय टेक्निकल इंटर्नच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी येणारा सर्व खर्च जपानतर्फे करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जपान यांच्यात टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम (टीआयटीपी) साठी होणाऱ्या कराराला (एमओसी) मंजुरी दिली असल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

धर्मेंद्र प्रधान हे १६ ऑक्टोबरपासून तीन दिवसीय जपान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान एमओसीवर सह्या केल्या जाऊ शकतात.

धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, टीआयटीपी ३ लाख भारतीय टेक्निकल इंटर्नला तीन ते पाच वर्षांसाठी जपानमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठवणार आहे. हा एक महत्वकांक्षी कार्यक्रम आहे ज्यानुसार या तरुणांना प्रशिक्षणासाठी पाठवणार आहे.

प्रत्येक तरुणाला तीन ते पाच वर्षांसाठी जपानमध्ये पाठवणार आहे. या कालावधीत हे तरुण तेथील परिस्थितीत काम करतील आणि त्यांना नोकरीची संधीही मिळेल. तसेच या तरुणांसाठी राहणं आणि जेवणाचीही सुविधा करण्यात येणार आहे. या तरुणांपैकी जवळपास ५० हजार तरुणांना जपानमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जपानमध्ये आवश्यकतेनुसार पारदर्शक पद्धतीने या तरुणांची निवड करण्यात येणार आहे.