‘चिनूक’ देशसेवेत दाखल, भारतीय वायुदलाचं बळ वाढलं

चिनूक’च्या येण्याने भारतीय वायुदलात आणखी एका सक्षम हॅलिकॉप्टरची भर पडली आहे. 

Updated: Mar 25, 2019, 10:37 AM IST
‘चिनूक’ देशसेवेत दाखल, भारतीय वायुदलाचं बळ वाढलं title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ करत ‘चिनूक’ हे हॅलिकॉप्टर सोमवारी अधिकृतरित्या वायुसेनेच्या ताफ्यात दाखल करत देशसेवेत रुजू करण्यात आले आहेत. चंदीगढमध्ये एका कार्यक्रमात हे हॅलिकॉप्टर वायुदलाच्या सेवेत दाखल झाले. जवळपास ११ हजार किलो पर्यंतचा शस्त्रसाठा आणि जवानांचं वजन पेलू शकणाऱ्या बलशाली ‘चिनूक’च्या येण्याने भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ झाली आहे, असं म्हणावं लागेल. 

वायुदल प्रमुख बी.एस. धानोआ यांनी ‘चिनूक’ हे भारतीय परिस्थितीला अनुसरुन तयार करण्यात आलेलं हॅलिकॉप्टर असल्याचं सांगत ही एक राष्ट्रीय मालमत्ता असल्याचं स्पष्ट केलं. ‘फक्त दिवसाच नव्हे, तर रात्रीही चिनूक कार्यरत असू शकणार आहे’, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. तर, चिनूकतं देशसेवेत येणं हे सारा खेळ बदलणारं ठरणार असून, ज्याप्रमाणे लढाऊ विमानांच्या यादीत राफेलचा समावेश झाल्यानंतरची परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याचप्रमाणे चिनूकच्या येण्याने वायुदलाच्या भक्कम स्थितीची जाणिव धानोआ यांनी करुन दिली. 

कठिण प्रसंगांमध्येही शस्त्रसाठा आणि जवानांचा भार पेलू शकणाऱ्या बोईंग या कंपनीने साकारलेल्या ‘चिनूक’च्या येण्याने भारतीय वायुदलात आणखी एका सक्षम हॅलिकॉप्टरची भर पडली आहे. सागरी मार्गाने हे हॅलिकॉप्टर भारताकडे गुजरातमधील मुंद्रा बंदरावर हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती बोईंग इंडियाकडून देण्यात आली आहे. २०१५ मध्ये भारताने १५ ‘चिनूक’ हॅलिकॉप्टर आणि २२ अपाचे अटॅक हॅलिकॉप्टर्सचा वायुदलात समावेश करुन घेण्यासाठी जवळपास २.५ अरब डॉलर्सचा व्यवहार केला होता.