VIDEO: व्हॉट्सअॅप युजर्सला भारतीय सैन्याने दिला 'हा' सल्ला

तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.

Sunil Desale Updated: Mar 19, 2018, 10:04 PM IST
VIDEO: व्हॉट्सअॅप युजर्सला भारतीय सैन्याने दिला 'हा' सल्ला title=
Representative Image

नवी दिल्ली : तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

सध्याच्या काळात तरुणांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला पहायला मिळतात. याचाच फायदा चीनी हॅकर्स घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

हॅकर्सकडून हॅक करण्याचे प्रयत्न

चिनी हॅकर्सकडून व्हॉट्सअॅप हॅक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंदर्भात स्वत: भारतीय सैन्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन अलर्ट केलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातुन भारतीय सैन्याने सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप आणि सैनिकांना चीनी हॅकर्सपासून सावध राहण्याची सूचना केली आहे.

भारतीय सैन्याने केला व्हिडिओ प्रसिद्ध

भारतीय सैन्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ ट्विट करून चिनी हॅकर्सकडून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून असलेल्या धोक्याबाबत सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारे भारतीय सैन्याने चीनी हॅकर्सकडून सावध राहण्याचे अलर्ट यापूर्वीही देण्यात आले आहेत.

व्हिडिओत सांगण्यात आलं आहे की, नुकत्याच अशा काही घटना समोर आल्या आहेत ज्या ठिकाणी सेनेच्या अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चीनी हॅकर्स असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओत या संदर्भातील नंबर्सबाबतही माहिती देण्यात आली आहे. या हॅकर्सचा नंबर +86 सीरिजने सुरु होतो. भारतीय सैन्याच्या नुसार, चीनी हॅकर्स मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय सैन्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत व्हॉट्सअॅप युजर्सला सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप अॅडमिन आणि सदस्यांनी सावध रहायला हवं आणि +86 सीरिजने सुरु होणाऱ्या नंबर असलेल्या सदस्यापासून सावध राहण्यास सांगण्यात आलं आहे.