सुरक्षा दलाकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

 घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे.

Updated: Jun 1, 2020, 12:55 PM IST
सुरक्षा दलाकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सुरक्षा दलाकडून नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानी सेनेचा, या दहशतवाद्यांची भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची योजना होती.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सेना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून गेल्या अनेक दिवसांपासून नौशेरा, पुंछ आणि हिरानगरसह इतर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात येत आहे. रविवारी रात्रीपासून मेंढर आणि नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरु आहे. या गोळीबारामुळे सीमेलगत राहणाऱ्या लोकांचं मोठं नुकसान होत आहे. परंतु पाकिस्तानचा हा घुसखोरीचा डाव भारतीय सेनेने उधळून लावला आहे.

सुरक्षा दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, घुसखोरी करण्याऱ्या दहशतवाद्यांचे मृतदेह हाती येत नाही तोपर्यंत आतापर्यंत किती दहशतवाद्यांना मारण्यात आलं हे सांगता येणं कठिण आहे. मात्र ही संख्या 3हून अधिकही असू शकते. या भागात शोधमोहीम सुरु आहे. 

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या बडगाममधून नार्को टेरर मॉड्यूल पकडण्यात आलं आहे. त्याशिवाय दहशतवाद्याचे 6 मदतनीसही ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून 1 चायनीयज पिस्टल, 1 किलो हेरॉइन, 1 लाख 55 हजार रुपये रोख आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस, 50 राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफच्या संयुक्त टीमने ही कारवाई केली आहे.