Indian Railway : दर दिवशी भारतातून असंख्य प्रवासी अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी देशांतर्गत रेल्वे सुविधेचा वापर करतात. भारतीय रेल्वेकडून ही सेवा देशाच्या विविध भागांमध्ये पुरवली जाते आणि त्यातून कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक प्रवास करत असतात. पण, सर्वांसाठीच रेल्वेनं प्रवास करण्याचा अनुभव सुखद असतो असं नाही. याचीच प्रचिती नुकतीच एका महिला प्रवाशाला आली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सोशल मीडियाचा आधार घेत त्यासंदर्भातील माहिती जाहिरपणे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्यात आली.
सोशल मीडियावर रचित जैन नावाच्या एका युजरनं त्यांच्या बहिणीसोबत रेल्पे प्रवासादरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला. रेल्वेच्या दारापाशीच इतकी गर्दी होती की नाईलाजानं त्यांच्या बहिणीला रेल्वेतून बाहेर निघावं लागलं, किंबहुना उडी मारावी लागली. यावेळी या महिलेचं लहान मूल रेल्वे स्थानकावरच राहिल्यामुळं या गर्दीतून त्यांना जीव धोक्यात घालावा लागला.
रचित यांनी बहिणीच्या या वाईट अनुभवाविषयी सांगताना लिहिलं, 'मुलाला सोबत घेण्यासाठी स्वत:ची सुरक्षितता धोक्यात टाकत रेल्वेमधून उतरण्याखेरीज इतर कोणताही पर्याय तिच्याकडे (बहिणीकडे) उरला नव्हता, यामध्ये तिला दुखापतही झाली. तिकीटाचे पूर्ण पैसे मोजूनही प्रवाशांना अशा गंभीर अडचणींचा सामना करावा लागणं ही अतिशय विदारक बबा आहे. बरं, या प्रवाशांना प्रसाधनगृहांपर्यंत जाण्याचाही वाव या गर्दीत मिळत नाही हे किती दुर्दैव.
तिथं स्पष्टच दिसतंय की तिकीट नसणारे प्रवासीसुद्धा रेल्वेतून सर्रास प्रवास करत आहेत. या परिस्थितीवर आता तातडीनं कारवाई करत प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी देणं गरजेचं आहे.'
Dear @AshwiniVaishnaw @RailMinIndia @RailwaySeva,
I must bring to your attention the dire state of 3AC coaches. Today, my sister faced a harrowing experience while trying to board a train. Overcrowding near the gates prevented her from entering, and in the chaos, her child was… pic.twitter.com/TdnxVpp9RO
— Rachit Jain (@rachitpjain) April 13, 2024
जैन यांनी ही पोस्ट लिहीत पोलीस आणि रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत तुमच्या कोणासोबतही असं काही घडलं आहे का? असा प्रश्नही त्यांनी पोस्ट केला आणि त्यावर अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली.
प्रवास सुखकर होण्यासाठी म्हणून अनेक प्रवासी त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार रेल्वेचं तिकीट काढून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. पण, बऱ्याचदा नियम आणि अटींची पायमल्ली करत बहुतांश प्रवासी रेल्वेतील या राखीव आसनांवर अतिक्रमण करताना दिसतात, ज्यामुळं आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशा या फुकट्या प्रवाशांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर आता प्रशासन नेमकी काय कारावाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.