जागते रहो! ट्रेनचा मोटरमन डुलक्या घेत असेल तर...; भारतीय रेल्वेनं आणलं नवं तंत्रज्ञान

Indian Railway : तिथं देशात नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांसाठी खटाटोप सुरु असतानाच इथं प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत रेल्वे काही नव्या यंत्रणा वापरात आणताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 11, 2023, 09:30 AM IST
जागते रहो! ट्रेनचा मोटरमन डुलक्या घेत असेल तर...; भारतीय रेल्वेनं आणलं नवं तंत्रज्ञान title=
indian Railway To Introduce Device That Can Detect Drowsy Driver

Indian Railway : भारतीय रेल्वेनं आतापर्यंत प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशा या रेल्वे विभागाकडून आता पुन्हा एकदा एक नवा प्रयोग केला जाणार आहे. जिथं चक्क रेल्वे अपघात टाळणंही शक्य होणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या नव्या पर्यायामुळं रेल्वेचा मोटरमन डुलक्या खात असेल तर तेसुद्धा क्षणाक कळणार आहे. 

नॉर्थर्न फ्रंटियर रेल्वेकडून सध्या AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेतली जात असून, एक अशी यंत्रणा तयार केली जात आहे ज्या माध्यमातून मोटरमनच्या पापण्यांची उघडझाप मोजली जाणारप आहे. हे प्रमाण जास्त असल्यास एक अलार्म वाजून त्यांना जास्तच झोप येत असल्यास रेल्वे थांबवण्यासाठीचा सतर्कतेचा इशारा देण्यात येणार आहे. Railway Driver Assistance System (RDAS) असं नाव असणारी ही यंत्रणा फक्त अलार्म वाजवणार नाही, तर इमर्जन्सी ब्रेकही मारणार आहे. जेणेकरुन मोटरमनला भानावर येण्यास क्षणाचाही विलंब झाला तरीही संकट मात्र टाळता येईल. 

रेल्वेशी संलग्न सुत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार सध्या या यंत्रणेवर कार सुरु असून, त्याची चाचणीही सुरु करण्यात आली आहे. ज्यासाठी एनएफआरचे तंत्रज्ञ सध्या प्रयत्न करत असल्याची बाबही समोर आली. ही यंत्रणा चाचणी टप्प्यातून पुढे आल्यानंतर प्राथमिक स्तरावर ती 20 मालवाहू रेल्वे गाड्यांमध्ये आणि पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनमध्येही बसवण्यात येणार आहे. 

चाचणीनंतर पुढे काय?  

रेल्वेमध्ये ही यंत्रणा रुजू झाल्यानंतर सर्व विभागीय रेल्वेंकडून त्यासंदर्भातील प्रतिक्रिया आणि अनुभव मागवले जाणार आहेत. जेणेकरून यंत्रणेमध्ये काही त्रुटी असल्यास त्यावर काम करणं अधिक सोपं होईल. दरम्यान, सध्या देशातील बहुतांश जलदगती रेल्वेगाड्यांमध्ये मोटरमनला सतर्क करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. 

सध्या कोणती यंत्रणा वापरात? 

सध्याच्या घडीला देशातील वेगवान गाड्यांमध्ये foot-operated lever (pedal) लावण्यात आले आहेत. ज्यावर मोटरमननं दर 60 सेकंदांना दाद देणं आवश्यत आहे. काही कारणास्तव असं न झाल्यास रेल्वेमध्ये असणारे emergency brakes आपोआपच सक्रिय होऊन रेल्वे थांबवली जाते. त्यामुळं सध्याची यंत्रणाही मोटरमनला बऱ्याच अंशी सतर्क ठेवताना दिसत आहे.