मुंबई : रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशभरात आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. १५ पैकी ८ विशेष मार्गांवर एसी गाड्या सोडण्यात येकणार आहेत. मुंबईतून दिल्लीसाठी आज विशेष गाडी रवाना होईल. मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवासी येण्यास सुरुवातही झाली आहे. तर तिकडे नवी दिल्ली स्टेशनवरुन आज संध्याकाळी ४ पासून ३ विशेष गाड्या सुटणार आहेत. नवी दिल्ली स्टेशनसॅनिटाईज करण्यात आले असून प्रवासी जमण्यास सुरुवात झाली आहे.
या विशेष रेल्वे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहेत. डिब्रुगढ, अगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू-तवी येथे जाणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे.
सर्व विशेष रेल्वे गाड्यांना मर्यादित थांबे असतील. राजधानी रेल्वेच्या तिकीटाइतकेच तिकीट या गाड्यांसाठी असेल. म्हणजे प्रवाशांना तिकीटासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. यासह दिवसाला ३०० श्रमिक विशेष रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा निर्धार आहे. त्यामुळे राज्या-राज्यांत अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी परतण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वे आणि एसटीच्या माध्यमातून अनेक मजूर आपल्या गावी परतले आहेत.
नवी दिल्लीहून रेल्वे सुटणार असल्यामुळे स्टेशनवर गर्दी सुरू झाली आहे. घरी जाणार असल्यामुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. मात्र रेल्वे एजंटकडून तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत उघड झाला आहे. दुप्पट पैसे घेऊ एजंट प्रवाशांना लूटत आहेत. त्यामुळे प्रवशांनी नाराजी व्यक्त केली आहे.