Indian Railways: ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा, आता मोजावे लागणार इतके पैसे

कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या मोफत बेडरोलची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही, आता ही सुविधा सुरु करण्यात आली आहे, पण यासाठी तुम्हाला तुमचा खिसा सैल करावा लागणार आहे.

Updated: Oct 19, 2021, 09:15 PM IST
Indian Railways: ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा, आता मोजावे लागणार इतके पैसे

Indian Railways : राजधानीसह लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये, स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवाशांना कोरोनापूर्वी बेडरोल पुरवण्याची सुविधा उपलब्ध होती. पण कोविड सुरु झाल्यानंतर, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी, रेल्वे व्यवस्थापनाने बेडरोल / ब्लँकेट देणे बंद केलं आणि प्रवाशांना त्यांना घरातूनच ब्लँकेट आणण्यास सांगण्यात आलं होतं. 

आता हिवाळा सुरु होतोय, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रवाशांकडून बेडरोल किटची मागणी होऊ लागली आहे. पण अद्याप भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये मोफत बेडरोल सुविधा सुरु केलेली नाही. रेल्वे व्यवस्थापनाचा सध्या यावर विचार विनिमय सुरु आहे. प्रवाशांना बेडरोल पुरवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर भारतीय रेल्वेने बहुतेक मार्गांवर प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या ट्रेनची सुविधा सुरू केली आहे. कोविड नियमांचं पालन करत आता देशात सुमारे 95 टक्के रेल्वे पुन्हा धावू लागल्या आहेत आणि 90 टक्क्यांहून अधिक बुकिंग होत आहे. पण पूर्वीप्रमाणे प्रीमियम, मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या एसी कोचमध्ये बेडरोलची सुविधा सुरू झालेली नाही.

एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशनवर डिस्पोजेबल ट्रॅव्हल बेडरोलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिल्ली विभागाने दिल्ली स्थानकावरुन धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल सुविधा दिली आहे. पण यासाठी प्रवाशांना 300 रुपये द्यावे लागणार आहेत.

डिस्पोजेबल ट्रॅव्हल बेडरोल किट या तीन प्रकारच्या आहेत. आपल्या सोयीनुसार प्रवासी तीनपैकी कोणतीही किट घेऊ शकतो. पहिली किट 300 रुपयांची आहे, यात प्रवाशांना ब्लँकेट, बेडशीट, उशी, उशी कव्हर, डिस्पोजेबल बॅग, टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचं तेल, फणी, सॅनिटायजर पाऊच, पेपरसोप आणि टिश्यूपेपर मिळेल.

दुसऱ्या किटची किंमत 150 रुपये आहे, यात प्रवाशांना केवळ एक ब्लँकेट दिलं जाईल. तर तिसरी किट मॉर्निंग किट आहे. याची किंमत केवळ 30 रुपये आहे. यात रेल्वे प्रवाशांना टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचं तेल, फनी, सॅनिटायजर पाऊच, पेपरसोप आणि टिश्यू पेपर दिला जाईल.

सध्यातरी रेल्वेत प्रवाशांना मोफत ब्लँकेट पुरवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच यावर निर्णय होऊ शकतो. हिवाळ्याचा हंगाम लक्षात घेता सध्या रेल्वे स्थानकांवर डिस्पोजेबल ब्लँकेट, बेडशीट आदि वस्तूंची दुकानं सुरु करण्याची मान्यता देण्यात आली आहे.