भारतातला पहिला डिजिटल भिकारी, भिकेसाठी क्यूआर कोडचा फंडा

या भिकाऱ्याने चक्क ऑनलाईन भीक मागायला सुरूवात केली आहे, त्याचा हा अनोखा अंदाज पाहून लोकांनाही त्याचं कौतुक वाटतं. 

Updated: Feb 8, 2022, 10:55 PM IST
भारतातला पहिला डिजिटल भिकारी, भिकेसाठी क्यूआर कोडचा फंडा  title=

बातमी आहे एका भिकाऱ्याची,  हा साधासुधा भिकारी नाहीए, तर तो आहे देशातला पहिला हायटेक, डिजिटल भिकारी.  या हायटेक भिकाऱ्याचं नाव आहे राजू.  त्यानं भीक मागण्यासाठी चक्क क्यूआर कोड तयार केला आहे. बिहारच्या बेतिया रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या कालीबाग मंदिराजवळ राजू भीक मागतो. गळ्यात क्यूआर कोडचा बोर्ड अडकवूनच तो हिंडतो. आपल्या खास स्टाईलमध्ये लोकांना हाक मारतो आणि भीक मागतो.  

गेल्या काही महिन्यांपासून सुट्या पैशांचं कारण देत लोक भीक देण्यास टाळटाळ करत होते.  मग काय ! राजूने नामी शक्कल लढवत थेट बँकेत खातं उघडलं आणि ईवॉलेट सुरू केलं. आता सुटे पैसे नाहीत, असं कुणी सांगितलं की तो थेट क्यूकोडचा बोर्ड पुढे करतो. 

बँक खातं उघडताना त्याला थोडे कष्ट पडले. त्याचं आधार कार्ड होतं, पण पॅनकार्ड नव्हतं. मग राजूनं आधी पॅनकार्ड काढलं आणि मग स्टेट बँकेत खातं उघडलं. राजू हा लालूप्रसाद यादव यांचा मोठा फॅन आहे. 2005 ते 2015 अशी 10 वर्षं लालूंच्या सांगण्यावरून त्याला सप्तक्रांती एक्सप्रेसच्या पँट्री कारमधून मोफत जेवण मिळत होतं. 

मात्र आता तो स्वत: जेवणावर खर्च करतो. लालूंनंतर राजू चाहता आहे तो पंतप्रधान मोदींचा. त्यांच्याच डिजिटल इंडिया अभियानातून प्रेरणा घेऊन राजूनं ऑनलाईन भीक मागायला सुरूवात केली आहे. त्याचा हा अनोखा अंदाज पाहून लोकांनाही त्याचं कौतुक वाटतं.