अमृतसरमधील रेल्वे अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे; गार्ड आणि ड्रायव्हरला क्लीन चिट

१९ ऑक्टोबर रोजी रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी हा भीषण अपघात झाला होता.

Updated: Nov 22, 2018, 10:55 PM IST
अमृतसरमधील रेल्वे अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे; गार्ड आणि ड्रायव्हरला क्लीन चिट title=

अमृतसर: रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी अमृतसरमध्ये झालेला भीषण रेल्वे अपघात हा लोकांच्या निष्काळजीपणामुळेच घडला, असे रेल्वे खात्याकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या सुरक्षा विभागाचे आयुक्त एस.के. पाठक यांनी गुरुवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये म्हटले आहे की, लोक निष्काळजीपणे रेल्वे ट्रॅकवर उभे राहिल्यामुळेच ही दुर्घटना घडली. 

स्थानिक प्रशासन किंवा आयोजकांनी रेल्वे खात्याला कार्यक्रमाची पूर्वसूचना द्यायला पाहिजे होती. जेणेकरून रेल्वे प्रशासनाला तशी काळजी घेता आली असती. मात्र, तसे न घडल्यामुळे हा अपघात रेल्वे ट्रॅकजवळील लोकांच्या चुकीमुळे घडला, अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात लोको पायलट, गार्ड आणि इतर सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. 

येथील धोबी घाट परिसरात १९ ऑक्टोबर रोजी रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी हा भीषण अपघात झाला होता. यावेळी भरधाव वेगात असलेल्या जालंधर-अमृतसर एक्स्प्रेसने ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकांना चिरडले होते. फटाक्यांच्या आवाजामुळे लोकांना ट्रेन येत असल्याचे समजले नाही. परिणामी बेसावध लोक गाडीखाली चिरडले गेले. यामध्ये ६१ लोकांचा मृत्यू झाल होता.