नवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी नव्याने विकसित केलेल्या 'क्रू एस्केप' प्रणालीची यशस्वीरित्या चाचणी केली. या प्रणालीमुळे आपातकालीन परिस्थितीत अंतराळवीरांना सुखरुपणे यानातून बाहेर पडणे शक्य होईल. भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाच्यादृष्टीने हे खूप मोठे यश मानले जात आहे. आजच्या यशस्वी चाचणीमुळे 'क्रू एस्केप' प्रणालीची विश्वासर्हता सिद्ध झाल्याचे इस्रोने म्हटले.
श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या तळावरून या कॅप्सुलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. अंतराळ प्रवासादरम्यान झालेल्या कुठल्याही दुर्घटनेत या कॅप्सुलचा वापर करून अंतराळवीर आपले प्राण वाचवू शकतील. या चाचणी संदर्भात माहिती देताना इस्रोचे चेअरमन के. सिवान म्हणाले, क्रू बेलआऊट सिस्टिमवर कॅप्सुलची चाचणी घेण्यात आली. तसेच ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. या चाचणीदरम्यान व्यक्तीऐवजी क्रू मॉडेलचा वापर करण्यात आला. हे मॉडेल कॅप्सुलमध्ये अॅटॅच करण्यात आले होते. तसेच ही कॅप्सुल रॉकेलच्या इंजिनाला जोडून अंतराळात पाठवण्यात आली होती. त्यानंतर काही वेळाने ही कॅप्सुल सुरक्षितपणे समुद्रात निर्धारित करण्यात आलेल्या ठिकाणी उतरली.
Successful Flight Testing of Crew Escape System - Technology Demonstratorhttps://t.co/phyy9jxR8X
— ISRO (@isro) July 5, 2018