15 ऑगस्टला ISRO मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; अंतराळात पाठवणार....

ISRO अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाला एक मोठं सरप्राईज देण्यात येणार आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 8, 2024, 02:28 PM IST
15 ऑगस्टला ISRO मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; अंतराळात पाठवणार....  title=
ISRO to launch EOS 8 an Earth Observation Satellite on 15 august

ISRO News : जागतिक स्तरावर अवकाश क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. चांद्रयान 3 असो किंवा मग मिशन आदित्य एल 1. अतिशय महत्त्वपूर्ण मोहिमांना पूर्णत्वास नेणाऱ्या इस्रोनं 2028 साठी चांद्रयान 4 मोहिम दृष्टीक्षेपात ठेवलेली असतानाच इस्रो यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशातील असंख्य नागरिकांना एक खास भेट देणार आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार इस्रो येत्या काळात ऑब्जर्वेशन सॅटेलाईट म्हणजे EOS-8 लाँच करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून हा उपग्रह लाँच होणार असून, इस्रोच्या माहितीनुसार या सॅटेलाईटचं वजन 175.5 किलोग्रॅम असल्याचं सांगितलं जात आहे. इस्रोच्या या उपग्रहामुळं वातावरणाचं निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर तांत्रिक गोष्टींसंदर्भात महत्त्वाचं योगदान दिलं जाणार आहे. 

इस्रोची आगामी मोहिम असणाऱ्या या मोहिमेमध्ये तीन विशेष स्टेट ऑफ द आर्ट पेलोड असून, इलेक्ट्रो ऑप्टिकल इंफ्रारेड पेलोड (EOIR), ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम, रिफ्लेक्टोमेट्री पेलोड (GNSS-R) आणि सिर युवी डोजीमीटर. 15 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी हा उपग्रह अंतराळाच्या दिशेनं झेपावणार आहे. 

हेसुद्धा वाचा : रेंट अ‍ॅग्रीमेंट 11 महिन्यांचीच का बनवतात? घर भाडे तत्त्वावर देण्याआधी जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर 

इस्रोच्या या मोहिमेची मदत अनेक पद्धतींनी होणार असून, वणवा, ज्वालामुखी या आणि अशा अनेक संकटांसह त्सुनामी, वादळ, समुद्राच्या पृष्ठावरील वादळ या साऱ्याचं विष्लेषण करत यंत्रणांना सावध करण्यासाठी होणार आहे. जमीनीतील आर्द्रता आणि पूरस्थिती यासोबतच अनेक गोष्टींमध्ये मदत करणाऱ्या या मोहिमेची मदत मिशन गगनयानमध्येही मिळणार आहे. 

सदर मोहिमेअंतर्गत इस्रोचा हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठापासून साधारण 475 किमी अंतरावर घिरट्या घालणार असून, या मोहिमेचा कालावधी आहे 1 वर्ष. हा उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी एसएसएलव्ही रॉकेटचा वापर केला जाणार असून, आता ही मोहिम यशस्वी करण्यासाठीच इस्रोची संपूर्ण टीम प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.