Rent agreement : घर भाडे तत्त्वावर देत असताना किंवा ते भाडे तत्त्वावर घेत असताना काही कागदोपत्री व्यवहार पूर्ण करावे लागतात. या सर्व व्यवहारांमध्ये सर्वात महत्तावाचा असतो तो म्हणजे भाडेतत्त्वाचा करार अर्थात रेंट अॅग्रीमेंट. हा करार करत असताना त्याची सुरुवातीची आणि अंतिम तारीख पाहिल्यास एक महत्त्वाची बाब जाणवते, ती म्हणजे घर वर्षभरासाठी भाडे तत्त्वावर घेण्याच्या प्रयत्न असला तरीही हा करार मात्र अवघ्या 11 महिन्यांसाठीच केला जातो. असं का? माहितीये का यामागचं कारण? रेंट अॅग्रीमेंट 10 महिन्यांसाठी का तयार केलं जात नाही?
भाडेतत्त्वाचा करार हा एक महत्त्वाचा कागदोपत्री ऐवज असून, त्यालाच रेंट अॅग्रीमेंट असं म्हणतात. सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीकडून ज्यावेळी त्यांची संपत्ती भाडे तत्त्वावर दिली जाते तेव्हा ती संपत्ती भाडे तत्त्वावर घेणाऱ्या व्यक्तीशी हा करार केला जातो. या करारात मालक आणि घर भाडे तत्वावर घेणाऱ्या व्यक्तीची माहिती असते. त्याशिवय भाडे कराराच्या सुरुवातीची आणि करार संपण्याची तारीखही नमूद असते.
भारतीय नोंदणी कायदा 1908 च्या तरतुदींनिसार एका वर्षासाठी संपत्तीची नोंदणी अतिशय आवश्यक आहे. यासाठीच नोंदणी प्रक्रिया आणि स्टँप इत्यादी खर्चांमध्ये कपात करण्यासाठी रेंट अॅग्रीमेंट 11 महिन्यांचीच असते.
एका वर्षाहून कमी दिवसांसाठीचा भाडेतत्वाचा करार झाल्यास त्या संपत्तीची नोंदणी करावी लागत नाही. त्यामुळं अनेकदा 11 महिन्यांच्याच अॅग्रीमेंटला प्राधान्य दिलं जातं. हा करार करत असताना स्टँप ड्युटीसुद्धा कमी लागते. राज्याराज्यानुसार अॅग्रीमेंट नोंदणीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात रक्कम आकारली जाते. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 11 महिन्यांच्या अॅग्रीमेंटमध्ये कायदेशीर सुरक्षिततेची हमी तुलनेनं कमी असते. त्यामुळं अशा व्यवहारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.