अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा

जैशचा म्होरक्या मसूद अजहर हल्ला करण्याच्या तयारीत

Updated: Dec 26, 2019, 09:09 AM IST
अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा title=
संग्रहित फोटो

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येमध्ये जैशचा म्होरक्या मसूद अजहर हल्ला करण्याचा कट रचण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा संदेश गुप्तचर यंत्रणांनी इंटरसेप्ट केला आहे. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित टेलिग्राम वाहिनीवर जैश चीफ मसूद अझहरचा संदेश गुप्तचर यंत्रणांनी इंटरसेप्ट केलाय. टेलीग्राम वाहिनीवर मसूद अझरचा संदेश शेअर करण्यात आला आहे, ज्यात रामजन्मभूमीवर हल्ला करण्याचा कट रचल्याचं सांगितलं जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतर देशभरातील सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणेचा हा अहवाल सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठविण्यात आला आहे. या अहवालात अयोध्यासह देशातील महत्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित नेटवर्कवर देशभरात सातत्याने नजर ठेवली जात आहे. 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात हिंसक निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये आंदोलनकर्त्यांकडून जोरदार दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. देशभरात झालेल्या या हिंसक निदर्शनांमध्ये जवळपास १८ जणांचा मृत्यू झाला. याच वातावरणात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. जैश-ए-मोहम्मद्वारा वातावरण बिघडवण्यासाठी या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याचं बोललं जात आहे.