नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्यानं अमानुष मारहाण करणाऱ्या घटनेवर राहुल गांधी यांनीही सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया नोंदवलीय. पण, या प्रतिक्रियेनंतर त्यांनी स्वत:वर वाद ओढावून घेतलाय... राहुल गांधी यांनी ट्विट करताना मारहाण करणारे 'सवर्ण' असल्याचा उल्लेख केलाय. परंतु, खरी परिस्थिती म्हणजे जळगावातील या घटनेत मारहाण करणाऱ्या व्यक्तीही मागास समाजातीलच आहेत.
'महाराष्ट्रातील या दलित मुलांचा अपराध केवळ इतकाच होता की ते एका सवर्णांच्या विहिरीत उतरले होते... आजही मानवता आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करतेय. RSS/BJP चा मनुवादीय हिंसेच्या राजकारणाविरुद्य आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही' असं राहुल गांधी यांनी ट्विट करताना म्हटलंय.
महाराष्ट्र के इन दलित बच्चों का अपराध सिर्फ इतना था कि ये एक "सवर्ण" कुएं में नहा रहे थे।
आज मानवता भी आखरी तिनकों के सहारे अपनी अस्मिता बचाने का प्रयास कर रही है।
RSS/BJP की मनुवाद की नफरत की जहरीली राजनीति खिलाफ हमने अगर आवाज़ नहीं उठाई तो इतिहास हमें कभी माफ नहीं करेगा pic.twitter.com/STeBSkI1q1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2018
यावरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा सविस्तर माहिती न घेता सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं दिसून येतंय... त्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.
जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातील घटनेनंतर आज पीडित कुटुंबियांना बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी विरोधी पक्षांसह, मागासवर्गीय संघटनांची नेतेमंडळी आज वाकडी गावात भेट देऊन पीडित कुटुंबीयांची विचारपूस करणार आहेत. आता थोड्याच वेळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गावात येत आहेत. दरम्यान प्रत्यक्षात ८० फूट खोल असणारी विहिर फक्त १५ फूट खोली दाखवण्यात आलीय. ही विहीर ज्यांच्या मालकीची आहे तेदेखील ओबीसी समाजातील आहेत. परंतु, १५ मुलं पोहयाला गेली असताना फक्त दोनच मुलांना मारहाण झाली, कारण ती मातंग समाजाची होती असाही आरोप होतोय. किशोरवयीन मुलांना नग्नावस्थेत पट्ट्याने तसंच काठीने बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या घटनेच्या निषेध नोंदविणाऱ्या प्रतिक्रिया काल देशभारातून उमटल्या आहेत. त्यावर आता राजकरण रंगू लागलंय.
सुरुवातीला या प्रकरणी अटकेसाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी आता दोघांना अटक केलीय. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावातल्या मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं ही अमानुष मारहाण केल्याचं पुढं आलंय. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.