Pulwama Attack : जैश-ए-मोहम्मद रचतंय आणखी मोठ्या हल्ल्यांचा कट

 'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत 

Updated: Feb 21, 2019, 01:22 PM IST
Pulwama Attack : जैश-ए-मोहम्मद रचतंय आणखी मोठ्या हल्ल्यांचा कट  title=

जम्मू : भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद येत्या काळात जम्मू आणखी काही आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून नुकतच मिळालेल्या माहितीनुसार सध्या 'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संबंधित धागेदोऱ्यांच्या बळावर आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात येत आहे. 

जैश-ए-मोहम्मदच नव्हे तर हिज्बुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटनासुद्धा आत्मघाती हल्ल्याचा कट रचत असल्याचं म्ह़टलं जात आहे. आयईडीच्या मदतीने सुरक्षा दलांना निशाण्यावर धरत मोठा घातपात घडवण्याचा त्यांचा मनसुबा समोर आला आहे. हा हल्लाही फिदाईनद्वारे घडवून आणण्याची आखणी झाली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सीमेनजीकही सध्या तणाव आणि सतर्कतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

फिदाईन भारतात घुसखोरीसाठी तयार 

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पाच ते सहा फिदाईन हे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असून. तूर्तास ते सीमेनजीक असणाऱ्या दहशतवादी तळांजवळील परिसरात आसरा घेत असून हल्ला करण्यासाठीच्या संधीच्या शोधात आहेत. 

१४ फेब्रुवारीला केला होता आत्मघाती हल्ला

१४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे मोठा हल्ला घडवून आणण्यात आला होता. सीआरपीएफ जवान जात असणाऱ्या बसच्या ताफ्याला एका कारने धडक देत एक स्फेट घडवून आणला. या हल्ल्यातच सीआरपीएफच्या ४० जवानांचे प्राण गमावले. अतिशय भयावह अशा या हल्ल्याच फिदाईनचा हात असून, हल्लल्याचे सूत्रधार काही दिवसांपूर्वीच झालेल्या सैन्यदलाच्या कारवाईत मारले गेले. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सर्व परिंनी प्रयत्न करण्यात येत असून, यामध्ये कोणतीही हयगय केली जात नसल्याचं पाहायला मिळत आहे.