'मी तुम्हाला थोड्या वेळाने परत फोन करतो,' शहीद जवानाचे 'ते' शब्द शेवटचे ठरले; कुटुंबीयांचा आक्रोश

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत  लष्कराच्या कर्नल आणि मेजरसह तीन जवान शहीद झाले. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट अशी तिघांची नावं आहेत.   

शिवराज यादव | Updated: Sep 14, 2023, 11:46 AM IST
'मी तुम्हाला थोड्या वेळाने परत फोन करतो,' शहीद जवानाचे 'ते' शब्द शेवटचे ठरले; कुटुंबीयांचा आक्रोश title=

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराच्या कर्नल आणि मेजरसह तीन जवान शहीद झाले. याशिवाय जम्मू काश्मीरच्या पोलीस अधीक्षकालाही वीरमरण आलं. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट अशी तिघांची नावं आहेत. एका शहीद जवानाची ओळख पटलेली नाही. दरम्यान, कर्नल मनप्रीत सिंग यांचं चकमक झाली त्यादिवशी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी कुटुंबीयांशी बोलणं झालं होतं. त्यांचं हे बोलणं कुटुंबीयांसोबतचं शेवटचं संभाषण ठरलं. 

दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्यांना वीरमरण आलं. या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. पण त्याची काहीच माहिती हाती लागलेली नाही. 

"आम्ही सकाळी 6.45 वाजता त्यांच्याशी शेवटचं बोललो होतो. त्यांनी नंतर फोन करतो असं सांगितलं होतं. ते एक चांगले व्यक्ती होते. त्यांना आपल्या कर्तव्यासाठी सेनेकडून पदकही देण्यात आलं होतं. मी त्यांना सलाम करतो," असं कर्नल मनप्रीत सिंग यांचा मेहुणा विरेंदर गिलने म्हटलं आहे. 41 वर्षीय मनप्रीत सिंग हे 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये कमांडिग अधिकारी होते. 

दरम्यान 34 वर्षीय मेजर आशिष यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे. हरियाणाच्या पाणीपतमध्ये ते वास्तव्यास आहेत. "फोनवरच आमचं शेवटचं बोलणं झालं होतं. दीड महिन्यापूर्वी तो घऱी आला होता. ऑक्टोबरमध्ये घऱाचं शिफ्टिंग असल्याने तो पुन्हा येणं अपेक्षित होतं," असं मेजर आशिष यांच्या काकाने सांगितलं आहे. 

जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट हे सेवानिवृत्त महानिरीक्षक गुलाम हसन भट यांचे सुपुत्र होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना वीरमरण आलं. दोन महिन्यापूर्वीच त्यांच्या घऱी चिमुरडीचं आगमन झालं होतं. 

पोलीस अधिकारी आणि लष्कर जवानांचे पार्थिव जंगलातून ताब्यात घेण्यात आले. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग आणि लष्कराचे 15 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी मृतदेह बाहेर काढण्याच्या देखरेखीसाठी चकमकीच्या ठिकाणी धाव घेतली होती. 

नेमकं काय झालं?

गडोले परिसरात मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरु करण्यात आली. पण नंतर रात्री ही कारवाई थांबवण्यात आली. बुधवारी सकाळी दहशतवादी परिसरात लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. कर्नल सिंग या कारवाईचं नेतृत्व करत होते. यादरम्यान, दहशतवाद्यांनी लष्कराच्या पथकावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, गोळीबारात लष्कर अधिकारी. जवान आणि पोलीस अधिकारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आणि अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.