श्रीनगर : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्लल्याचा तपास सध्या सुरू झाला आहे. साऱ्या देशाला शोकसागरात टाकणाऱ्या या हल्ल्यात जवळपास ८० किलो आरडीएक्स वापरलं गेल्याचं उघ़ड होत आहे. हे आरडीएक्स पाकिस्तानातून पूंछवाटे घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांच्या सहाय्याने २०१८ मध्ये भारतात आणण्यात आलं. ज्यानंतर हळूहळू दक्षिण काश्मीरच्या शोपियान या ठिकाणी ते नेण्यात आलं. शोपियानवरुन ते गॅस सिलेंडर आणि कोळशाच्या पिशव्यांतून पुलवामाच्या त्राल मिडोरा या गावात पोहोचवण्यात आलं.
सूत्रांचा हवाला देत 'झी न्यूज'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जैश-ए-मोहम्मदच्या या १३ दहशतवाद्यांमध्ये कामरान आणि रशिद गाझी यांचाही समावेश होता. हे दोघंही आरडीएक्स हल्ल्यात तरबेज असल्याचं म्हटलं जातं. कामरान आधी काश्मीरच्या उत्तरेकडे गेला तर रशिद दक्षिण काश्मीरमध्येच थांबला. या दोन्ही ठिकाणी आत्मघाती हल्ल्यासाठीच्या दहशतवाद्याची शोधाशोध सुरू झाली. अखेर आदिल अहमद दार हा रशिदच्या संपर्कात आला. आदिलल भेटल्याचं कळताच कामरान पुन्हा दक्षिण काश्मिरमधील मिडोरा या गावी आला. रशिद आणि कामरान या दोघांनीही आदिलला हल्ल्यासाठी तयार करण्यास सुरुवात केली. अनेक महिने अवघ्या इयत्ता बारावीच्या या आदिलचं ब्रेनव़ॉश करत त्याचा दृष्टीकोनच बदलण्यात आला. अखेर तो आत्मघाती हल्ल्यासाठी तयार झाल्यानंतर पुलवामा हल्ल्याची तयारी करण्याचा बेत आखण्यास सुरुवात झाली.
हल्ल्ल्याच्या तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स हे पाकिस्तानातून आल्याचं कळत आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीक असणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांतून ज्यावेळी दहशतवाद्यांना भारतीय सीमेत पाठवण्यात येतं तेव्हा कोळशामध्ये ठेवून थोड्या थोड्या प्रमाणात त्यांच्यासोबत आरडीएक्स पाठवण्यात येतं.
ज्यावेळी या हल्ल्याचा कट रचला जात होता तेव्हा अशा ठिकाणाची शोधाशोध सुरू झाली जेथे सुरक्षा दलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे सुरक्षा दलाच्या तळावर हल्ला न करता दहशतवाद्यांनी यावेळी खुला हल्ला करण्याचं ठरवलं. कारण त्याआधी २०१७ मध्ये लेथपुरा येथे सीआरपीएफच्या तळावर हल्ला करण्याचा त्यांचा कट फसला होता. अखेर जम्मू- काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर हल्ला करण्याचं ठरलं ज्या ठिकाणहून दररोज सुरक्षादलाच्या अनेक गाड्यांच्या ताफ्याची येजा सुरू असते.
बर्फवृष्टीनंतर बरेच दिवस महामार्ग बंद असल्यामुळे ही वाहतूक थांबली होती. पण, महामार्ग खुला झाल्यावर मात्र मोठ्या प्रमाणात सैन्यदलाच्या गाड्यांचा ताफा काश्मीरच्या दिशेने निघाला. याची माहिती दहशतवाद्यांना मिळाली आणि हल्ल्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस निश्चित झाला. पुढे, कामरान आणि रशिदने त्या गाडीत स्फोटकं ठेवली आणि त्याच दिवशी दुपारी आदिल या गाडीने जोडरस्त्याने महामार्गावर आला. जवळपास ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास सीआरपीएफच्या बसचा ताफा या महामार्गावर आला जे पाहताच आदिलने आपली कार ही त्या ताफ्यासोबत चालवण्यास सुरुवात केली आणि पुढच्याच क्षणाला हा हल्ला घडवून आणला.
अवघ्या एका धडकेत मोठा स्फोट झाला ज्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. अतिशय भीषण अशा या हल्ल्यात घटनास्थळी सीआरपीएफच्या अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यात जवळपास ४० जवान शहीद झाले, तर त्यातील काहींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आता भारतात संतापाची लाट उसळली असून, लष्कराने हल्ल्याचा मास्टर माइंड कामरान आणि रशिदचा खात्मा करत दहशतवादाविरोधात कठोर पाऊल उचललं.