नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी एका काश्मीरी तरुणीसोबत दिसून आलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मेजर गोगोई यांना आता लष्करी न्यायालयाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. २३ मे रोजी श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये मेजर गोगोई एका काश्मीरी तरुणीला घेऊन गेले होते. त्यावेळी हॉटेल मालकाने त्यांना रुम देण्यास नकार दिला होता. यावरुन मेजर गोगोई यांनी हॉटेल मालकाशी हुज्जतही घातली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले होते.
या पार्श्वभूमीवर आता लष्कराच्या चौकशी न्यायालयासमोर मेजर गोगोई यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. या चौकशीअंती XV कॉर्प्सला अहवाल सादर केला जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास मेजर गोगोई यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्युटीवर तैनात असताना कार्यक्षेत्राच्या बाहेर असणे आणि स्थानिक महिलांशी सख्य ठेवणे या लष्कराच्या नियमाचे उल्लंघन या दोन गोष्टींमुळे मेजर गोगोई दोषी ठरण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी या तरुणीने मेजर गोगोई यांना क्लीन चीट दिली होती. ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब तरुणीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर दिला होता. आम्हाला काही वेळ एकत्र घालवायचा होता. त्यामुळे ती त्यांच्यासमवेत हॉटेलात गेले, असेही तिने सांगितले होते.