अतिरेक्यांच्या गोळीबारात गमवलं कुटुंब, आज संगीतातून मनं जोडण्याचा प्रयत्न

अतिरेक्यांनी डोडामधल्या एका वस्तीत घुसून तब्बल १५ लोकांना ठार केलं होतं. 

Updated: Jul 19, 2019, 03:57 PM IST
अतिरेक्यांच्या गोळीबारात गमवलं कुटुंब, आज संगीतातून मनं जोडण्याचा प्रयत्न title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : आजच्याच दिवशी वीस वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये एक भयानक घटना घडली होती. अतिरेक्यांनी डोडामधल्या एका वस्तीत घुसून तब्बल १५ लोकांना ठार केलं होतं. हे सगळं घडलं एका चार वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांदेखत. पुढे काय झालं त्या मुलाचं. सध्या तो काय करतो आणि काश्मीर खरंच किती बदललं आहे. याबाबतचा हा एक रिपोर्ट.

मिशन काश्मीर सिनेमामध्ये दाखवण्यात आलेल्या घटनेप्रमाणेच २० वर्षांपूर्वी घडलं होतं. १९ जुलै १९९९ ची ती संध्याकाळ होती. जम्मू-काश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यातलं लीहैटा गावात अतिरेकी घुसले आणि अंदाधुंद गोळीबार करत तब्बल १५ लोकांना ठार केलं. त्याच घरात होता छोटा जोगिंदर सिंह. आजही तो दिवस त्याच्या डोळ्यासमोरुन हलत नाही.

चार वर्षांच्या जोगीचं जगच संपून गेलं. पण तरीही तो परिस्थितीशी लढत राहिला. काश्मीरमधल्या बालग्राममध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर जोगी पुण्याच्या सरहद संस्थेत आला. कारण त्याला पुढे शिकायचं होतं.

जोगिंदरचे नातेवाईक अजूनही काश्मीरमध्येच आहेत. सरकारनं त्यांचा सन्मान केला. पण सरकारनं आश्वासनं अजूनही पूर्ण केली नाहीत. त्या दिवसाच्या काळ्याकुट्ट आठवणी आजही जोगिंदरच्या मनात ताज्या आहेत. पण त्याच्या मनात बदल्याची भावना नाही. की त्याला कधी दगड भिरकावासा वाटला नाही. उलट तो मनं जोडण्याचा प्रयत्न संगीताच्या माध्यमातून करतो.

वीस वर्षांचा काळ झरझर निघून गेला. पण काश्मीर आजही धुमसतंय. पण जोगीसारख्या शांतीदूतांमुळेच काश्मीर खोऱ्यात शांततेची चिन्हं दिसतील.