मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?

Maharashta CM: दिल्लीत बैठक महायुतीची असली तरी या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्रं कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Nov 28, 2024, 08:55 PM IST
मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब? title=
महायुती

Maharashta CM: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढच्या काही तासांत दिल्लीत ठरणार आहे. महायुतीच्या दिल्लीतल्या या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महायुतीचे नेते दिल्ली जातायेत. दिल्लीतल्या या निर्णयाकडं महाराष्ट्राचे डोळे लागलेत.

दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे ठरणार आहे. महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघंही दिल्लीत दाखल झालेत. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असेल आणि कोण मुख्यमंत्री असेल हे निश्चित होणार आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणाही दिल्लीत होऊ शकते. अजित पवारांनीही तसं स्पष्टपणं सांगून टाकलंय.

एकनाथ शिंदेही दिल्लीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे  हे उपमुख्यमंत्रिपद स्वतःकडे घेणार की पक्षाच्या नेत्याकडं देणार हे ही आजच्याच बैठकीत निश्चित होणार आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांना काय खूशखबर मिळणार असा प्रश्न विचारला. त्यावर नंतर सांगेन असं सागून ते पुढं निघाले.

दिल्लीत बैठक महायुतीची असली तरी या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्रं कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहेत.

एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?

"मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे.  तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

"आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. आमचं कधीही एकमेकांप्रती वेगळं मत राहिलेलं नाही. आम्ही सर्व निर्णय एकत्र बसून घेतले आहेत. निवडणुकीपूर्वीही आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आमच्या श्रेष्ठींसोबत बसून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं आणि तसंच होणार आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

शिंदेंनी सर्व अधिकार दिल्लीला दिल्यावरुन टोला...

शिंदेनी सर्व अधिकार दिल्लीकडे सोपवल्याचा उल्लेख करत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊतांनी, 'प्रश्न असा आहे की त्यांचा असा दावा कसा असू शकतो?' असा सवाल उपस्थित केला. "जे स्वत:ला शिवसेना मानतात त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शाहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. जर शिवसेना निवडणूक आयोगाने तुमच्या हातात दिलेली आहे. त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मोदी-शाहांना देत असाल तर तुम्ही बाळासाहेबांचा स्वाभिमान, अभिमान असं बोलू नका," असा टोला राऊतांनी लगावला आहे.