Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.  2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Updated: Apr 25, 2023, 02:01 PM IST
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी title=
संग्रहित छाया - पीटीआय

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपविरोधात भाजपचे काही आमदार आक्रमक झाले असून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात  पकडला आहे. याठिकाणी काँग्रेस कमबॅक करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. त्यामुळे या जागा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने व्युहरचना आखली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभा घेण्याचे नियोजन आहे.

कर्नाटकात काँग्रेस आणि एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, भाजपने फोडाफोडीचे राजकारण करत कुमारस्वामी यांना पायउतार केले. आता कुमारस्वामीही कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहेत.  कर्नाटकात जेडी (एस) किंगमेकर होण्याचा विश्वास आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी, यांनी एकहाती राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजपच्या आरोपांना तोंड दिलेय. कुमारस्वामी यावेळी किंगमेकर असतील, असे बोलत आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही प्रचारात आघाडी घेतली असून कमी फरकारने गेलेल्या 60 जागा घेण्यावर भर दिला आहे. काँग्रेसने देशाच्या कानाकोपऱ्यातून निरीक्षकांना बंगळुरुला बोलावून घेतले आहे. त्यांच्यावर याची जबाबदारी सोपविण्याचा विचार केलाय.

काँग्रेसला मतदारांचा कौल मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी सर्व निरीक्षकांची बैठक घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत खरगे यांनी प्रत्येक नेत्याची स्वत: भेट घेतली. कमी मताधिक्याने गमावलेल्या जागा पुन्हा कशा मिळतील यावर भर देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला एका जागेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सांगण्यात आले आहे. भाषण आणि व्यासपीठ सोडून काँग्रेस उमेदवारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला येथे बोलाविले आहे, हे लक्षात घ्यावे अशा सूचना काँग्रेस बैठीक देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे निरीक्षक निवडणुका होईपर्यंत कर्नाटकात ठाण मांडून बसणार आहेत. तसे त्यांना आदेश देण्यात आले आहेत. या नेत्यांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्या भागातून बाहेर जायचे नाही, असेही त्यांना सांगण्यात आले. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हेही कर्नाटकात वेगवेगळ्या भागात  आजपासून प्रचार करणार आहेत. राहुल गांधी यांच्या तब्बल 25 रॅली करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. ही निवडणूक काँग्रेसने जास्तच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे.