"तुम्ही मला खोटं सिद्ध केलंत, मला वाटलं होतं तुम्ही...," पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर कादरी यांनी मोदींसमोर व्यक्त केल्या भावना

Craftsman Qadri praises PM Modi: कर्नाटकमधील बिदरी हस्तकला कलाकार (Bidri craft artist) शाह रशीद अहमद कादरी (Shah Rasheed Ahmed Quadri) यांना पद्म पुरस्काराने (Padma Award) सन्मानित करण्यात आलं आहे. दरम्यान हा पुरस्कार मिळाल्यानंतर कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानत तुम्ही मला खोटं सिद्ध केलं अशा भावना व्यक्त केल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 6, 2023, 06:11 PM IST
"तुम्ही मला खोटं सिद्ध केलंत, मला वाटलं होतं तुम्ही...," पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर कादरी यांनी मोदींसमोर व्यक्त केल्या भावना title=

Craftsman Qadri praises PM Narendra Modi: कर्नाटकमधील बिदरी हस्तकला कलाकार (Bidri craft artist) शाह रशीद अहमद कादरी (Shah Rasheed Ahmed Quadri) यांना बुधवारी पद्म पुरस्काराने (Padma Award) सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार वितरण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान यावेळी कादरी यांनी नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानत तुम्ही मला खोटं सिद्ध केलं अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्यातील संवादाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र यावरुन काँग्रेसने टीका केली असून हे ठरवून केल्याचा आरोप केला आहे. 

पद्म पुरस्कार सोहळ्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कादरी यांचं अभिनंदन केलं. यावेळी कादरी यांनी त्यांना सांगितलं की "मी युपीए सरकारच्या काळात पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा करत होते. पण मला तेव्हा मिळाला नाही. तुमचं सरकार आल्यानंतर भाजपा सरकार मला कोणताही पुरस्कार देणार नाही असं वाटत होतं. पण तुम्ही मला खोटं सिद्ध केलं. मी तुमचे मनापासून आभार मानतो".

नरेंद्र मोदी आणि कादरी यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. दरम्यान काँग्रेसने या व्हिडीओवरुन नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. "कर्नाटक निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी त्यांनी रशीद कादरी यांना असं विधान करण्यास सांगितलं, ज्यामुळे त्यांना मुस्लिम मतदारांची सहानुभूती मिळेल. पण तसं काही होणार नाही," अशी टीका काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी केली आहे. दरम्यान भाजपा काही ठराविक विधानंच समोर आणत आहे असा आरोपही त्यांनी केली आहे. 

कर्नाटकातील हस्तकला गुरू शाह रशीद अहमद कादरी यांनी 500 वर्षं जुनी बिदरी कला जिवंत ठेवली आहे. बिदरी कलेचा उगम कर्नाटकातील बिदर येथून झाला आहे. येथून बाहेर पडल्यानंतर या कलेने आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्येही आपले पाय रोवले.

रशीद कादरी हे बिदरी कलेतील प्रसिद्ध घराण्यातील आहेत. 1970 पर्यंत या कलेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर रशीद कादरी यांनी कोरीव कामाची जबाबदारी स्वीकारली आणि अनेक नाविन्यपूर्ण रचना आणि नमुने तयार केले. बिदरी कलाकुसरीचे जतन आणि विकास करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

दरम्यान काँग्रेसने टीका केल्यानंतर भाजपा नेते शहजाद पूनावाला यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. हा कादरी यांचा अपमान असल्याचं ते म्हणाले आहेत. 

"हा फक्त एका कलाकाराचा नाही तर सामान्य पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांचा अपमान आहे. आज हा पुरस्कार खऱ्या अर्थाने लोकांचा झाला आहे आणि काँग्रेस कुटुंब त्यांच्यावर, कर्नाटकची कला, संस्कृती यांच्यावर हल्ला करत आहे. ," असं ते म्हणाले आहेत.