भाजप : गुजरातमध्ये झटका, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सावध पाऊले

गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 8, 2018, 08:32 PM IST
भाजप : गुजरातमध्ये झटका, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सावध पाऊले title=

नवी दिल्ली : जोरदार तयारीनिशी जंगलात वाघाच्या शिखारीला जावे आणि सुमार कामगिरीमुळे सरतेशेवटी एखादा ससा किंवा छोटेशे हरीण घेऊन यावे, अशीच काहीशी स्थिती भाजपने गुजरातमध्ये अनुभवली. तब्बल १५० जागा निवडणून आणण्याचे लक्ष्य ठेवलेल्या भाजपला अवघी शंभरीही पार करता आली नाही. तिसुद्धा आपल्या घरच्या मैदानावर. पराभवाच्या छायेत असलेल्या भाजपची गाडी शेवटी ९९वर अटकली. हा अनुभव पाठीशी असल्यामुळे आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सावध पावले टाकताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या हालचालींवर टाकलेला हा कटाक्ष...

केवळ १५० जागांचे भाजपचे लक्ष्य

गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे. गुजरातमध्ये २२४ जागांसाठी विधानसभा निवडणुका होत आहेत. एकूण २२४ जागांपैकी किमान १५० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. तसेच, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी भाजपने आगोदरच काळजी घेतली आहे. मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडियुरप्पाचा चेहरा पुढे करण्यावर भाजपमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

गुजरातमुळे पक्ष नेतृत्त्वावर प्रचंड टीका

सूत्रांनी म्हटले आहे की, गुजारतमध्ये भाजपने १८२ जागांपैकी १५० जागांचे लक्ष ठेवले होते. मात्र, भाजपला शंभरीही पार करता आली नाही. त्यामुळे भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या दुकलीला प्रचंड टीका सहन करावी लागली. इतकी की, भाजपच्या गोटातूनच प्रश्न उमटायला लागले की, खरेच इतके मोठे लक्ष्य ठेवण्याची गरज होती का?

कर्नाटकात भाजपसमोर कडवे आव्हान

दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजपसाठी गुजरातसारखी स्थिती नाही. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला म्हटले जायचे. तसेच, २०१४ नंतर कॉंग्रेसला भराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गुजरात निवडणुकीपर्यंत कॉंग्रेसचा इतिहास हा पराभवाचाच इतिहास राहिला होता. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर चित्रच पालटले. भलेही गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभव स्विकारावा लागला. पण, कॉंग्रेसचे संख्याबळ वाढले. ज्यामुले भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला मोठा लगाम लागला. दुसरे असे की, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तसेच, भाजपला नेहमीसारखा अतिअत्मविश्वास ठेऊन चालणार नाही. कारण, कर्नाटकात काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत नाही. पण, भाजपच्या धुरीणांचे म्हणने असे की, कर्नाटकमध्ये लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल नाराजी आहे.

भाजपसमोर बंडाळीचे आव्हान

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून बी.एस. एडियुरप्पाचे नाव पक्षातून पुढे येत आहे. मात्र, असे असले तरी, कर्नाटक भाजपमध्ये ईश्वरप्पांचाही एक गट जोरदार कार्यरत आहे. अर्थात सध्यास्थितीत ईश्वराप्पा गटाला शांत करण्यात पक्षनेतृत्त्वाला यश आले असले तरी, ऐनवेळी बंडाळी होणारच नाही. असेही नाही. त्यामुळे भाजपला कर्नाटकात अनेक अव्हानांचा सामना करावा लागणार आहे.