Karnataka Election: कर्नाटकात बजरंग दलावरुन वाद का पेटला आहे? RSS चा याच्याशी काय संबंध?

Karnataka Election 2023: कर्नाटकात (Karnataka) बजरंग दलावरुन (Bajrang Dal) सध्या वाद पेटला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) सत्तेत आल्यास बजरंग दलावर (Bajrang Dal) बंदी घालण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन पेटलं आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मतदारांना मतदान करताना 'जय बजरंगबली' घोषणा देण्याचं आवाहन केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 4, 2023, 06:11 PM IST
Karnataka Election: कर्नाटकात बजरंग दलावरुन वाद का पेटला आहे? RSS चा याच्याशी काय संबंध? title=

Karnataka Election 2023: कर्नाटकात (Karnataka) सध्या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) रणसंग्राम सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचारसभा सुरु असतानाच काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे (Congress Manifesto) मात्र वाद पेटला आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेसने जाहीरनाम्यात जर आपण सत्तेत आलो तर बजरंग दलावर (Bajrang Dal) बंदी घालू असं आश्वासन मतदारांना दिलं आहे. यानंतर बजरंग दल काँग्रेसविरोधात आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते दिल्ली आणि कर्नाटकमधील काँग्रेसच्या मुख्यालयांबाहेर आंदोलन करत असून, हे आश्वासन मागे घेण्याची मागणी करत आहेत. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधा घोषणाबाजी करत काँग्रेसचा जाहीरनामा जाळलादेखील आहेत. 

काँग्रेसने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी जात आणि धर्माच्या आधारे समाजात द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थांवर कारवाई कऱण्याचं आश्वासन दिलं आहे. या कारवाईत त्यांच्यावर बंदी घातली जाईल असा उल्लेख जाहीरनाम्यात आहे. बजरंग दल ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न असणाऱ्या विश्व हिंदू परिषदेची (VHP) युवा शाखा आहे.

श्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी दिल्लीत आंदोलन केलं असून, बजरंग दल हा देशाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. तसंच जर काँग्रेसने जाहीरनाम्यातून हे आश्वासन मागे घेतलं नाही तर संपूर्ण देशभरात आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला आहे. 

"बजरंग दल म्हणजे मनात राष्ट्रवादाची ज्योत पेटवणारी संघटना आहे. तसंच लाखो महिलांचं, गौमातेचं कत्तलीपासून रक्षण करणं, देशातील लोकांचं रक्तदान करुन जीव वाचवण्याचं काम करत आहे. बजरंग दल देशाचा अभिमान आहे आणि काँग्रेस त्याची तुलना दहशतवादी संघटना पीएफआयशी करत आहे," असं विश्व हिंदू परिषदेचे विजय शंकर तिवारी यांनी म्हटलं आहे. 

बजरंग दलाची पीएफआयशी तुलना करत काँग्रेसने आत्महत्या करण्याची योजना आखली आहे असंही ते म्हणाले आहेत. केंद्र सरकारने दहशतवादी कारवायांमुळे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पीएफआयवर बंदी घातली आहे. 

मोदींकडून 'जय बजरंगबली' घोषणा देण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कर्नाटकात होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आपल्या परंपरांचा छळ करत असून 10 मे रोजी मतदान करत त्यांना धडा शिकवा असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मी काँग्रेस नेत्यांची भ्रष्टाचारी सिस्टीम तोडल्याने ते माझ्याविरोधात द्वेष पसरवत आहेत असा आरोप त्यांनी केला. 

"कर्नाटकमधील कोणीही या छळ करणाऱ्या पंरपरेला स्वीकारणार आहे का? एखाद्याचा छळ झाल्याचं कोणाला आवडतं का? कर्नाटकमधील जनता त्यांना माफ करणार का? त्यांना तुम्ही शिक्षा देणार का? तुम्ही मतदान केंद्रावर बटण दाबताना 'जय बजरंगबली' अशी घोषणा देत त्यांना शिक्षा द्या," असं आवाहन मोदींनी यावेळी केलं. 

"खोटे आरोप आणि खोट्या हमी हा काँग्रेसचा एकमेव आधार आहे," अशी टीका मोदींनी यावेळी केली. अनेक दशके देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने देशाऐवजी स्वत:च्या विकासावर लक्ष केंद्रित केले आणि आपल्या नेत्यांची तिजोरी भरण्यासाठी एक यंत्रणा तयार केली असा आरोप त्यांनी केला.