दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा अपघात, विमानात १९१ प्रवासी

दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. 

Updated: Aug 7, 2020, 09:45 PM IST
दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा अपघात, विमानात १९१ प्रवासी

तिरुवनंतपूरम : दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये दुबईवरून आलेल्या विमानाचा रनवेवर अपघात झाला. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एयर इंडियाचं A737 बोईंग हे विमान रनवेवर घसरलं. घसरल्यानंतर या विमानाचे दोन तुकडे झाले. या विमानामध्ये १९१ प्रवासी होते. 

आज संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास लॅण्डिंगच्यावेळी करीपूर विमानतळावर ही दुर्घटना झाली आहे. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे विमान रनवेवर लॅण्डिंग केल्यावर दरीमध्ये कोसळलं, त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. एनडीआरएफची टीम करीपूर विमानतळावर दाखल झाली आहे. या विमानामध्ये १७४ प्रवासी, १० लहान मुलं, २ पायलट आणि ५ केबिन क्रू एवढे जण होते. विमानाचं लॅण्डिंग होत असताना आग लागली नसल्याचं डीजीसीएलकडून सांगण्यात आलं आहे. 

या विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. विमानतळावर सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि प्रवाशांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात येत आहे.