close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दुसरे लग्न केल्यानंतर आईला मुलाचे भावनिक पत्र, नेटकरीही भावूक

आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाचे भावनिक पत्र. आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा. 

Updated: Jun 12, 2019, 11:29 PM IST
दुसरे लग्न केल्यानंतर आईला मुलाचे भावनिक पत्र, नेटकरीही भावूक
Image credit : Facebbok/Gokul Sreedhar

कोल्लम : आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाने भावनिक पत्र लिहिले आणि हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर त्याचे पत्र वाचून नेटकरीही भावूक झालेत. गोकुळ श्रीधर याने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्याने म्हटलेय, ‘आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.’ आतापर्यंत मुलाच्या भावनिक पत्राला ३२,००० पेक्षा जास्त लाईक असून ४००० लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

गोकुळ याच्या आईला पहिल्या पतीकडून घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागले होते. सातत्याने ती मार खात होती. फक्त आपल्यासाठी आई हे सर्व सहन करत असल्याची खंत नेहमी गोकुळ याला वाटत होती. आपल्या मनावर एक ओझे घेऊन तो नेहमी जगत होता. पण आता जेव्हा त्याच्या आईने नव्या आयुष्याला सुरुवात केली, तेव्हा गोकुळ यांने आपण आनंदी असून, यापेक्षा दुसरी सुखावणारी कोणतीच गोष्ट नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत.

केरळ राज्यातील कोल्लम येथील गोकुळ श्रीधर याने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर लिहिलेली फेसबुक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून अनेकजणांनी त्याचे कौतुक केले आहे. मल्याळम भाषेत असणाऱ्या या ह्रदयस्पर्शी पोस्टमध्ये गोकुळ याने आपल्या आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, ही पोस्ट करावी की करु नये, असा मनात कल्लोल झाला होता. मात्र, त्याने ती पोस्ट केली. गोकुळ याच्या फेसबूक पोस्टमधून त्यांच्या आईने आयुष्यात खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत, हे स्पष्ट होत आहे.

गोकुळ म्हणतो,

‘ज्या महिलेने माझ्यासाठी तिने आपला आनंद आणि तिचे सारे सुख बाजूला ठेवले. तिने पहिल्या पतीकडून अनेक यातना सहन केल्या आहेत. जेव्हा तिला मारहाण व्हायची, डोक्यातून रक्त वाहायचे तेव्हा अनेकदा तू हे का सहन करत आहेस, हे मी तिला विचारायचो. यावेळी अनेकदा मी हे सगळे तुझ्या भल्यासाठी सहन करत असल्याचे ती सांगायची. हे मला स्पष्ट आठवतेय. तो दिवस जेव्ही मी तिच्यासोबत घर सोडलं तेव्हा मी या सर्व क्षणांचा विचार केला. जिने माझ्यासाठी सर्व तरुणपण घालवले, त्या माझ्या आईची अनेक स्वप्ने आहेत. अजून खूप मोठी उंची तिला गाठायची आहे. मला अजून काही बोलायचे नाही. ही अशी एक गोष्ट आहे जी लपवता कामा नये, असे मला सारखे वाटत होते. आई. सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.