नवी दिल्ली : Sanjay Raut on Kirit Somaiya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात चालली होती. त्यावेळी तिला वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा लोकवर्गणीतून निधी जमवला. हा निधी त्यांनी लाटला आहे. दरम्यान, हा निधी कोठे गेला याची चौकशी करून किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राऊत यांनी केला. ( Kirit Somaiya Did Fraud In Save INS Vikrant Warship Fund Says Sanjay Raut)
आयएनएस विक्रांत युद्धनौका भंगारात चालली होती. आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी 58 कोटी रूपये गोळा केले. सेव्ह विक्रांत चळवळ केली त्यातून पैसे गोळा केले. 200 कोटी रूपये राज भवनात जमा करू, असे सोमय्या यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
2013 - 2015 मध्ये विक्रांत नौकेसाठी पैसे जमा केले आहेत का, असे माहिती अधिकारात विचारले गेले होते. त्यावर राज्यपालांचे उत्तर आहे की, असे कोणतीही पैसे जमा केले नाहीत. आता सोमय्यांनी देशद्रोह केला, हे स्पष्ट होत आहे. माझ्यामते हा 100 कोटींच्यावर घोटाळा केला.
केंद्रीय यंत्रणांचा सोमय्यांना पाठिंबा आहे का ? तेही स्पष्ट करावे. कारण राष्ट्रद्रोह करणाऱ्याला केंद्रीय सुरक्षा पुरवली जात आहे. राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते कशी कारवाई करणार असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. याप्रकरणी सीबीआय, ईडीला हा गुन्हा मोठा वाटत नाही का? आयएनएस विक्रांतचे पैसे सोमय्यांनी त्यांच्या मुलाच्या कंपनीत वापरले आणि निवडणुकीसाठी ते वापरले गेलेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आयएनएस विक्रांत 'फाईल' पेक्षा हे भयंकर आहे, असे राऊत म्हणाले.