रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर 'समुद्रसपाटीपासूनची उंची' का बरं लिहिलेली असते?

भाऊ असं का बरं असतं?   

Updated: Jul 13, 2020, 06:04 PM IST
रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर 'समुद्रसपाटीपासूनची उंची' का बरं लिहिलेली असते?  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडे आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे फक्त देशातील नागरिकच नव्हे, तर सारं जग अगदी कुतूहलानं पाहतं. याच कुतूहलात भर तेव्हा पडते जेव्हा काही प्रश्न मनात घर करु लागतात आणि एक एक करत या प्रश्नांची उकल होत जाते. हे असंच का, या एका सर्वसमावेशक प्रश्नाच्या धर्तीवर अशाच एका रंजक गोष्टीची उकल इथे होणार आहे. 

रेल्वेने प्रवास करते वेळी कधी तुम्ही स्थानकावरी त्या स्थानकांचं नाव असणाऱ्या फलकाकडे लक्ष देऊन पाहिलं आहे का? रेल्वेस्थानक लहान असो किंवा मोठं, त्या प्रत्येक फलकावर स्थानकाचं नाव हिंदी, इंग्रजी आणि कित्येकदा उर्दू भाषेत लिहिलं जातं. हा फलक नीट पाहिलं असता लक्षात येईल की स्थानकाच्या मुख्य नावाखाली आणखीसुद्धा काहीतरी लिहिलेलं असतं. ही माहिती असते अनुक एक स्थानक समुद्र सपाटीपासून नेमकं किती उंचीवर आहे, याबाबतची. रेल्वे स्थानकावर त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची नेमकी का दिलेली असते असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 

'दुनिया गोल है....', याच ओळीनं या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात होते. पृथ्वी गोलाकार असल्यामुळं तिला एका समान उंचीवर मोजण्यासाठी शास्त्रज्ञांना कोणा एका अशा बिंदूची आवश्यकता होती जो एकसमान असू शकेल. यासाठीच सर्वोत्तम पर्याय ठरला समुद्र. समुद्राची पाणीपातळी ही एकसमान असते, असं म्हणतात. त्यामुळंच 'समुद्रसपाटीपासूनची उंची ...' असं लिहिण्यात येतं. 

आता रेल्वे स्थानकावर ही उंची लिहिण्यामागं नेमका काय फायदा? 

रेल्वे चालवणाऱ्या मोटरमनला याचा फायदा होतो. उदाहरणार्थ, रेल्वे १०० मीटर इतक्या समुद्रसपाटीपासूनच्या अंतरावरुन २०० मीटरच्या अंतरावर जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मोटरमन या उंचीच्या आधारे जास्तीची चढाई चढण्यासाठी त्याला इंजिनाला नेमकं कोणत्या स्तरावर न्यायचं आहे, किंवा हेच अंतर उतरतेवेळी त्याला किती ब्रेक लावायचा आहे याचा अंदाज येणं सोपं होतं. 

 

समुद्रसपाटीपासूनच्या उंचीमुळं रेल्वेवर असणाऱ्या तारांना एकसमान उंची देण्यासही मदत मिळते. जेणेकरुन रेल्वे आणि वीजेच्या तारा एकमेकांशी सतत जोडलेल्या राहू शकतील. एकंदरच, अतिशय लहानशी अशी ही गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते खरी पण, आपल्या प्रवासाशी तिचा थेट संबंध आहे हे मात्र नाकारता येत नाही.  

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x