केरळमध्ये कोरोनाची दहशत, सिनेमा थिएटर्स ३१ मार्चपर्यंत बंद

 केरळमध्ये आतापर्यंत १५ रुग्ण आढळलेत.

Updated: Mar 10, 2020, 04:25 PM IST
केरळमध्ये कोरोनाची दहशत, सिनेमा थिएटर्स ३१ मार्चपर्यंत बंद title=

केरळ : केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे सिनेमा थिएटर्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. केरळमध्ये आतापर्यंत १५ रुग्ण आढळलेत. केरळ राज्यात कोरोना व्हायरसचे आणखी ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे केरळमधल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १२ झाली आहे. तर देशातील कोरोना पीडितांची संख्या ४९ झाली आहे. 

केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातले सातव्या इयत्तेपर्यंतचे वर्ग आणि परीक्षा ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत. तर आठवी ते दहावी पर्यंतच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. तसंच सर्व सुट्टीकालीन वर्ग, अंगणवाड्या, मदरसे सुद्धा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

धोका वाढणार ?

Corona व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव अनेक राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुख्य म्हणजे चीनसोबतच भारतातही दहशत परसवलेल्या या व्हायरसच्या दृष्टीने आता भारतीयांसाठी धोक्याचा इशारा असल्याचं कळत आहे. होळी आणि रंगपंचमीनंतर भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू शकते, असा धोक्याचा इशारा चीनमधील काही तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतात अनेक ठिकाणी सध्या साधारण ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान आहे. त्यामुळे हे तापमान कोरोना विषाणूच्या प्रसारास पूरक असल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी येत्या काळात कोरोनाचा धोका आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे.