'ते' महिला मंडळ सर्वोच्च न्यायालयात धडकणार; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत नेमकं काय घडणार?

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात होणार एक नवा प्रयोग. सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत समोर येणार एक अनपेक्षित प्रकरण. तुम्ही याबद्दल ऐकलंच असेल.   

सायली पाटील | Updated: Aug 9, 2024, 08:06 AM IST
'ते' महिला मंडळ सर्वोच्च न्यायालयात धडकणार; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत नेमकं काय घडणार?  title=
Laapataa Ladies movie screening in Supreme Court

Supreme Court : देश पातळीवर राजकीय आणि सामाजिक घटकांवर परिणाम करणारी अनेक प्रकरणं आजवर सर्वोच्च न्यायालयानं निकाली काढलेली आहेत. असं असतानाच या प्रकरणांमध्ये आता एका नव्या मुद्द्याची भर पडणार असून, सरन्यायाधीशांपासून अनेकांच्याच उपस्थितीत 'एका' महिला मंडळाची कहाणी मांडली जाणार आहे. काही दिवसांपासूनच न्यायालयापुढं येणाऱ्या या महिला मंडळाची प्रचंड चर्चा सुरू असताना आता अखेर तो दिवस उजाडल्याचं पाहायला मिळत आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

कोण महिला? सर्वोच्च न्यायालयात थेट त्याच हजर होऊन नेमकं काय करणार? नेमकं प्रकरण काय? हाच प्रश्न अनेकांना पडत असताना आता अनेक गोष्टींवरून पडदा उठला आहे. मुळात हे कोणतंही गंभीर प्रकरण नसून, हे महिला मंडळ म्हणजे, बॉलिवूड चित्रपट 'लापता लेडिज'. 

किरण राव दिग्दर्शित कमालीची लोकप्रियता मिळवलेल्या या चित्रपटाचं स्क्रीनिंग थेट सर्वोच्च न्यायालयात होणार असून, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि रजिस्ट्री अधिकाऱ्यांसाठी या स्क्रीनिंगचं खास आयोजन करण्यात आलं आहे. लैंगिक समानतेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसंदर्भातील माहिती न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या वतीनं एका संदेशाच्या माध्यमातून देण्यात आली. 

अधिकृत माहितीनुसार चित्रपटाची दिग्दर्शिका किरण राव आणि निर्माता- अभिनेता आमिर खानही या खास क्षणी उपस्थित राहणार आहेत. अधिकृत संदेशानुसार, 'भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या 75 व्या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांअंतर्गत लैंगिक समानतेवर आधारित ''लापता लेडिज'' हा चित्रपट दाखवला जाणार आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रशासनिक भवन परिसरातील सी- ब्लॉक स्थित सभागृहात हा चित्रपट दाखवला जाईल. 

हेसुद्धा वाचा :  'चंद्रचूडसाहेब गुदरमल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'

SC Movie Screening

देशातील जनतेच्या मनात घर केलेल्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी खुद्द सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचीही उपस्थिती असल्याचं सांगितलं जात आहे. 

'लापता लेडिज' या चित्रपटाच्या कथानकाद्वारे गावखेड्यातील कुटुंब, महिला आणि दोन नववधूंच्या जीवनाभोवती फिरणारी एक सुरेख कहाणी गुंफण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान झालेली चूक आणि त्यानंतर पुढे जाणारं कथानक या चित्रपटातील प्रत्येक क्षणाला अधिक खास करताना दिसलं. प्रतिभा रांता, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवि किशन आणि सहकलाकारांनी आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाच्या कथानकात जीव ओतल्याचं पाहायला मिळतं.