Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पूँछमध्ये (Poonch Terrorist Attack) मुसळधार पावसाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी लष्कराच्या (Indian Army) वाहनावर केलेल्या हल्ल्यात गुरुवारी पाच जवान शहीद झाले आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर राजौरी येथे उपचार सुरू आहेत. दुपारी तीनच्या सुमारास भिंबर गली ते पूँछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला. यावेळी अतिरेक्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे लष्कराच्या वाहनाने पेट घेतल्याने राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान शहीद झाले. हे जवान दहशतवादविरोधी कारवाईसाठी जात होते. या जवानांमध्ये पंजाबच्या कुलवंत सिंग (Lance Naik Kulwant Singh) यांचाही समावेश होता.
शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मोगा येथील जवान कुलवंत सिंग यांच्यावर मूळ गावी चाडिक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुलवंत सिंग यांच्या तीन महिन्यांच्या मुलाने मृतदेहाला अग्नी देताच संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले होते. दुसरीकडे कुलवंत सिंग यांच्यावर मला गर्व आहे पण त्याच्या मुलाची काळजी वाटते असे त्यांच्या आईने म्हटलं आहे. कुलवंत सिंग हे लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आले होते. कुलवंत सिंग यांचे वडील कारगिर युद्धात शहीद झाले होते. त्यानंतर आता कुलवंत सिंग यांनाही पूँछमध्ये वीरमरण आले आहे.
@Whiteknight_IA salutes the sacrifice of Hav Mandeep Singh, L/Nk Debashish Baswal, L/Nk Kulwant Singh, Sep Harkrishan Singh, Sep Sewak Singh, who laid down their lives in the line of duty in #Poonch Sector on 20 Apr 23. We stand in solidarity with the bereaved families. pic.twitter.com/50D9HRdssa
— White Knight Corps (@Whiteknight_IA) April 20, 2023
लान्स नाईक कुलवंत सिंग यांचे वडील ही बलदेव सिंग हे लष्करात होते. बलदेव सिंह 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले होते. वडिलांच्या हौतात्म्यानंतर 11 वर्षांनी कुलवंत सिंग हे 2010 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. कुलवंत सिंग यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दीड वर्षांची मुलगी आणि तीन महिन्यांचा मुलगा आहे. शनिवारी त्यांच्या मुलानेच कुलवंत सिंग यांच्या चितेला अग्नी दिला.
"कुलवंतचे वडील शहीद झाले तेव्हा तो लहान होता. आज माझा मुलगाही वडिलांप्रमाणे शहीद झाला आहे. मला त्याचा अभिमान आहे, पण त्याच्या मुलांची काळजी कोण घेणार?" असा सवाल कुलवंत सिंग यांच्या आई हरजिंदर कौर यांनी केला आहे. तर "आता मी दुसरं काय करणार. पण माझ्या मुलांसाठी जगायचे आहे. माझी मुलं खूप लहान आहेत हे सगळं समजायला. आमच्यासाठी सगळं संपलं आहे," असे कुलवंत सिंग यांच्या पत्नीने म्हटलं आहे.
दरम्यान, एका निवेदनात लष्कराने म्हटले आहे की, गुरुवारी अज्ञात दहशतवाद्यांनी राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पुंछमधून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. त्यात पाच जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर, लष्कराने शुक्रवारी सुमारे सहा ते सात दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली. या कारवाईत लष्कर, निमलष्करी दल आणि स्थानिक पोलिसांचे सुमारे 2000 कमांडो तैनात करण्यात आले आहेत. या मोहिमेत मदत करण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरसह अनेक विशेष दलांची पथके या भागात रवाना करण्यात आली आहे, अशीही माहिती लष्कराने दिली आहे.