Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरी

Maharashtra LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   

Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरी

Ratan Tata death LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. 

राज्यासह मुंबई शहरात आजच्या दिवशी घडणाऱ्या सर्व घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर... 

10 Oct 2024, 11:48 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची गर्दी 

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास, आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी टाटांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. 'त्यांचं निधन ही संपूर्ण देशासाठी दु:खद बाब असून, त्यांच्या कामाची कोणासोबतची तुलना होऊच शकत नाही. त्यामुळं त्यांच्या कामाच्याच श्रीमंतीतून आपण सर्वांनी त्यांना कायम स्मरणात ठेवलं पाहिजे', असं ते म्हणाले. 

 

10 Oct 2024, 10:55 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: शरद पवारांकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली 

एनसीपीएमध्ये शरद पवार यांच्यासह त्यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतलं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन. टाटा कुटुंबीयांची भेट घेत तेलं सांत्वन. 

10 Oct 2024, 10:39 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: एनसीपीएत सर्वधर्मीय प्रार्थना... 

रतन टाटा यांचं पार्थिव एनसीपीएमध्ये पोहोचल्यानंतर तिथं सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आली. टाटा कुटुंबीय यावेळी इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेतेमंडळींनी घेतलं रतन टाटा यांचं अंत्यदर्शन. 

हेसुद्धा वाचा : 'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट

 

10 Oct 2024, 09:52 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात 

मुंबईतील कुलाबा इथं असणाऱ्या निवासस्थानी मुंबई पोलिसांच्या सलामीनंतर रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. इथून त्यांचं पार्थिव एनसीपीए इथं नेण्यात येणार असून, तिथं सामान्यांना पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. 

10 Oct 2024, 09:02 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांना सलामी 

मुंबई पोलिसांचे बँड पथक रतन टाटा यांना सलामी देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्याशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कुलाबा येथील निवासस्थानी दाखल झाला आहे. 

10 Oct 2024, 08:49 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मरिन ड्राईव्ह परिसरात वाहतुकीत बदल  

रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीए आणि नजीकच्या भागात तयारी सुरु करण्यात आली असून, इथं वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मरिन ड्राईव्ह इथं असणाऱ्या ओबेरॉय हॉटेलपाशी असणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 

10 Oct 2024, 08:14 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी साधला त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद 

रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा आणि टाटा कुटुंबीयांशी संवाद साधत श्रद्धांजली दिली, टाटा कुटुंबाला आधार दिला. अधिकृत माहितीनुसार केंद्र शासनाच्या वतीनं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यविधीसमयी उपस्थित राहतील. 

10 Oct 2024, 08:08 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: फक्त टाटा समुहासाठी नव्हे, तर सबंध भारतासाठी दु:खद दिवस... रतन टाटा यांच्या निधनानंतर रिलायन्स उद्योग समुहाकडून श्रद्धांजली. 

10 Oct 2024, 08:05 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्यावर कुठे होणार अंत्यसंस्कार? 

रतन टाटा यांच्यावर वरळीतील पारसी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. इथं दुपारी 4 वाजल्यानंतर त्यांचं पार्थिव आणलं जाईल. ज्यानंतर इथं असणाऱ्या प्रार्थना सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि यानंतर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 

10 Oct 2024, 07:45 वाजता

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात दुखवटा 

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात आज गुरुवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीची घोषणा केली. रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील, तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.