Ratan Tata death LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.
राज्यासह मुंबई शहरात आजच्या दिवशी घडणाऱ्या सर्व घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर...
10 Oct 2024, 21:05 वाजता
मुंबईत पावसाच्या जोरदार सरी
वीजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. परतीच्या पावसाने मुंबईत जोर धरला आहे.
10 Oct 2024, 18:52 वाजता
सिल्वर ओकवर संजय राऊतांनी घेतली शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट
गुरुवारी सिल्वर ओकवर जाऊन शिवसेनेचे संजय राऊत यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेतली. तिन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती असून महाविकास आघाडीत 200 जागांचे वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तर उर्वरित जागांवर लवकरच महाविकास आघाडीत होणार चर्चा होणार आहे. आघाडीचे नेते मुंबई बाहेर विविध मतदारसंघातली दौऱ्यावर असल्याने उद्याची नियोजित पत्रकार परिषद दसऱ्यानंतर घेतली जाईल अशी माहिती देण्यात आली.
10 Oct 2024, 17:31 वाजता
रतन टाटा अनंतात विलीन, वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी बुधवार 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 5 :30 च्या सुमारास वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आणि सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
10 Oct 2024, 16:25 वाजता
रतन टाटांना अखरेचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत प्रचंड जनसमुदाय दाखल
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांना मानवंदना देण्यासाठी आलेले VIP गेल्यावर तेथे प्रचंड जनसमुदाय दाखल झाला. त्यामुळे स्मशानभूमीत गर्दी झाली. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता टाटांचे नातलग आणि जवळच्या मित्र परिवारातील लोक यायला सुरुवात झाली असून कम्युनिटी हॉलमध्ये सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
10 Oct 2024, 15:55 वाजता
रतन टाटांच्या अंत्ययात्रेला NCPA तून सुरुवात
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA येथे ठेवण्यात आलं होतं. दुपारी ४ चा सुमारास रतन टाटांच्या अंत्ययात्रेला NCPA तून सुरुवात झाली आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
10 Oct 2024, 14:43 वाजता
गृहमंत्री अमित शहांनी घेतलं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून रतन टाटा यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी एमसीए येथे ठेवण्यात आलंय. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
10 Oct 2024, 13:48 वाजता
महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देणार - मंत्री उदय सामंत
टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनाचे दुःख म्हणून राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
10 Oct 2024, 12:59 वाजता
Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटांच्या अंत्यविधी आणि अंत्ययात्रेच्या नियोजनासाठी बीएमसी, टाटा ट्रस्ट यांच्याकडून नियोजन
मुंबई महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्याकडून रतन टाटा यांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यविधींचे नियोजन केलं जात आहे. माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर संध्या ५ वाजता अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी महापालिकेकडून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी रतन टाटांना निरोप देण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. स्मशानभूमीतील- कम्युनिटी हॉल येथे सामुहिक प्रार्थना होईल. मुंबईत पावसाची शक्यता असल्यानं वॉटरप्रुफ मंडपही पालिकेकडून उभारला जाणार आहे. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी होणारी गर्दी आणि व्हिआयपी लक्षात घेता पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त.
10 Oct 2024, 12:45 वाजता
Ratan Tata funeral LIVE updates: माजी खासदार सुभाष चंद्रा यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली
राज्यसभेचे माजी खासदार सुभाष चंद्रा यांनी X च्या माध्यमातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. 'रतनजींच्या जाण्यानं प्रचंड दु:ख झालं. त्यांची दूरदृष्टी आणि भारतीय उद्योगजगतावर त्याचे परिणाम वाखाणण्याजोगे आहेत. व्यावसायिक कारणांनी आमचा कायम संवाद होत असे. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत आहोत...' असं त्यांनी लिहिलं.
I'm deeply saddened to know about #Ratan ji’s demise.His visionary leadership & impact on Indian industry were profound.I regularly interacted with him on corporate issues & will always cherish his legacy of innovation & social responsibility. My condolences to his family.
— Subhash Chandra (@subhashchandra) October 10, 2024
10 Oct 2024, 11:50 वाजता
Ratan Tata funeral LIVE updates: दैवत हरवलं; रतन टाटांच्या निधनानं टाटा मोटर्सच्या कामगारांना भावना अनावर
पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक नगरी ही ओळख निर्माण करण्या मध्ये टाटा मोटर्सचा मोठा वाटा आहे. टाटा मोटर्स मुळे शहरातील हजारो कामगारांना रोजगार उत्पन्न झाला. टाटा मोटर्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनाने दैवत हरवल्याची भावना कामगारांनी व्यक्त केलीय.
हेसुद्धा वाचा : रतन टाटा म्हणजे Inspiration! त्यांचे हे Quotes तुम्हाला आयुष्यभर देतील प्रेरणा