बिहारच्या गया येथे लोकजनशक्ती पक्षाचे नेते मोहम्मद अन्वर अली खान यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद अन्वर अली खान सलूनमध्ये दाढी करत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपींनी एकूण तीन गोळ्या झाडल्या. यावेळी मोहम्मद अन्वर अली खान यांचा मुलगाही तिथेच बसलेल होता. मुलाच्या डोळ्यांसमोर हल्लेखोरांनी वडिलांची हत्या केली. हत्येनंतर हल्लेखोर पिस्तूल आणि बाईक तिथेच सोडून पळून गेले. हायवेवरील एका व्यक्तीची बाईक घेऊन ते पसार झाले.
हल्ल्यानंतर मोहम्मद अन्वर अली खान यांचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद अन्वर अली खान हे लोजपा लेबर सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. बाजारात गोळीबार झाल्यानंतर काहीवेळासाठी धावपळ सुरु झाली होती. काही लोकांनी घटनास्थळावरुन पळ काढला, तर काहींनी दुकान बंद करुन घेतलं. दरम्यान हत्येनंतर संतापलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग 82 रोखून धरला होता. संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
मोहम्मद अन्वर अली खान आपल्या मुलासह केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेले होते. अन्वर हे आमस ठाणे क्षेत्रातील सिहुली गावाचे रहिवासी होते. 2015 मध्ये गेरुआ मतदारसंघातून त्यांनी जनता दल युनायटेडच्या तिकीटीवर विधानसभा निवडणूक लढवली होती. सध्या ते चिराग पासवान यांच्या लोजपा (आर) चे सदस्य होते.
अन्वर यांच्यासह त्यांचा मुलगाही सलूनमध्ये होता. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, वडील दाढी करत असताना तिघेजण आत आले आणि दाढी करणं बंद करा असं सांगितलं. यानंतर त्याच्यातील एकाने गोळी झाडली. हत्या केल्यानंतर तिघेजण फरार झाले. त्याच्यातील एकाला मी ओळखू शकतो. शेरघाटीचे डीएसपी राजकिशोर सिंह यांनी सांगितलं आहे की, अन्वर अली खान यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. त्यांना जेलमध्येही जावं लागलं होतं.
हत्येनंतर समर्थकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. आरोपींना अटक करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली जात होती. पोलिसांनी सध्या स्थिती नियंत्रणात आणली आहे.