Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत देशाच्या माजी उपपंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती दिली. यानंतर अडवणी यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे.
लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत की, "मी अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने आज जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा स्विकार करत आहे. माझ्यासाठी फक्त एक व्यक्ती म्हणून ही सन्मानाची बाब नाही, तर त्या आदर्श आणि मूल्यांचाही सन्मान आहे ज्यांची मी आयुष्यभर पूर्ण क्षमतेने सेवा करण्याचा प्रयत्न केला".
"जेव्हा मी 14 वर्षांचा असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एक स्वयंसेवक म्हणून सहभागी झालो तेव्हापासून मी फक्त एकच प्रार्थना केली आहे. माझ्यावर आयुष्यात जी काही जबाबदारी सोपवली जाईल, ती पार पाडताना देशाला समर्पित आणि निस्वार्थ सेवा करावी. ज्या गोष्टीने मला आय़ुष्यात प्रेरणा दिली ते आदर्श वाक्य इदं न मम आहे. याचा अर्थ हे आयुष्य माझं नाही, माझं आयुष्य राष्ट्रासाठी आहे".
लालकृष्ण अडवाणी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्वाधिक काळ काम केलं. भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, "मी माझ्या पक्षाचे लाखो कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि इतर लोकांचे मनापासून आभार मानतो, ज्यांच्यासह मला सार्वजनिक आयुष्यातील पवासात काम करण्याची संधी मिळाली".
"मला माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि खासकरुन दिवंगत पत्नी कमला यांच्याप्रती आभार व्यक्त करायचे आहेत. ती माझ्या आयुष्यातील शक्ती आणि स्थिरतेचं मोठं स्त्रोत होती," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. आपला देश महानता आणि सन्मानाच्या शिखरावर प्रगती करो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.