Lockdown 4.0 हे नवे कलियुग । 'निर्मलाताईंना दु:ख व्हावे हे आक्रितच !'

देशात Lockdown 4.0 लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला यात धक्का बसावा असे काहीच नाही.  

Updated: May 19, 2020, 10:55 AM IST
Lockdown 4.0 हे नवे कलियुग । 'निर्मलाताईंना दु:ख व्हावे हे आक्रितच !' title=
संग्रहित छाया

मुंबई : देशात Lockdown 4.0 लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला यात धक्का बसावा असे काहीच नाही. केंद्र आणि राज्य सरकारांपुढे दुसरा पर्याय तरी काय होता, असा सवाल सामना संपादकीयातून विचारण्यात आला आहे. त्याचवेळी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे दिल्लीच्या रस्त्यांवर त्या मजुरांसोबत थांबले, थोडा वेळ बसले आणि बोलले. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना मोठे दु:ख व्हावे हे आक्रितच म्हणावे लागले. कुणी श्रमिकांचे दु:ख हलके करीत असेल तर सरकारला त्याचा आनंद व्हायला हवा, पण इथे उलटेच सुरु आहे. मंत्री लॉकडाऊन कुरवाळत बसले आहेत. मजूर लॉकडाऊन तोडून कच्चा-बच्च्यांसह रस्ते तुटवत निघाले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाचा एक नेता गांधी नावास जागून लोकांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ज्यांना याचे दु:ख होत आहे, त्यांनी यापुढे माणुसकी आणि परंपरेज्या गप्पा मारु नयेत, असा टोला केंद्रातील सत्ताधाऱ्यांना शिवसेनेने लगवाल आहे. 

कोरोनाने नवे कलुयुग आणले आहे खरे, असे सांगत शिवसेनेने केंद्रातील सरकारला चिमटा काढला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सर्वच ‘बंद’ आहे. त्या बंदच्या काळकोठडीतून बाहेर पडण्यासाठी लोक धडपडत आहेत, असे म्हणत शिवसेनेनं लॉकडाऊनवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चौथा ‘लॉकडाऊन’ घोषित केला आहे त्यातून जनजीवनासाठी काही खास सूट दिली आहे असे दिसत नाही. मेट्रो, रेल्वे सेवा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, जिम वगैरे बंदच राहतील. हे ‘बंद’ प्रकरण वाढवले असले तरी लोक खरोखर ‘बंद’चे पालन करु शकतील काय? असा सवालही शिवसेनेनेकेला आहे. 

सामना अग्रलेखात काय म्हटले आहे?

लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. हातात पैसे नाहीत. त्यामुळे ते आपल्या घरी निघाले आहेत. आजचे चित्र भयावह आहे. स्थलांतरित मजुरांची पायपीट आणि ससेहोलपट सुरुच आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतून हे मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंट, पश्चिम बंगाल येथे जायला निघाले तेव्हा त्यांना केंद्र सरकारने रोखले नाही. त्यांची व्यवस्था केली नाही. उत्तर प्रदेशच्या सीमेवर हे लाखो मजूर पोहोचले तेव्हा त्यांना तेथेच अडकवून ठेवले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनीही महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामीळनाडू या चार राज्यांत अडकलेल्या कर्नाटकच्या मजुरांना आणि इतर नागरिकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक भारतीयांना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे, असाप्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत चौथ्या लॉकडाऊनची घोषणा सरकारने केली म्हणून चिंता वाटते. लोकांची घरात बसायची तयारी आहे, पण भविष्याचा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. वृत्तवाहिन्यांवर अशी काही चित्रे दिसली ती ‘सोमालिया’सारख्या देशातील स्थितीची आठवण करुन देणारी आहेत.

तर दुसरीकडे रोजचे व्यवहार काही ठिकाणी टप्प्याटप्प्यांत सुरु होतील असे सांगितले जात आहे. हे टप्पे नेमके कधी सुरु होतील ते सांगणे कठीण आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मुंबईतून मोठ्या संख्येने ‘चाकरमानी’ कोकणात निघाले आहेत, पण त्यांनाही अनेक ठिकाणी जिल्हाबंदी केली आहे. स्थानिकांनी मुंबईकरांना जिल्ह्यांत आणि गावांत प्रवेशबंदी केली आहे. एका भीतीच्या विळख्यात महाराष्ट्र सापडला आहे. ही भीती दूर करायची की वाढवत ठेवायची, यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करुनही अपेक्षेप्रमाणे रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही, अशी चिंता सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.