लोकसभा निवडणूक २०१९ : हे आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनांविरोधात निवडणूक लढत आहेत

Updated: May 16, 2019, 02:14 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : हे आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार रमेश कुमार शर्मा हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे एकूण १,१०७ करोड रुपयांची संपत्ती आहे. रमेश कुमार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना नियमानुसार संपत्तीचं विवरण जाहीर केलं आहे.

बिहारच्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून रमेश कुमार शर्मा अपक्ष म्हणून उभे आहेत. इथं भाजपाकडून राम कृपाल यादव उमेदवार आहेत. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनांविरोधात निवडणूक लढत आहेत. 

रमेश शर्मा हे चार्टर्ड इंजिनिअर पदवीधारक आहेत. त्यांच्याकडे नऊ वाहने आहेत. यामध्ये फॉक्सवॅगन जेट्टा, होंडा सिटी आणि ओप्टा शेवरले या गाड्यांचाही समावेश आहे. शर्मा यांची एकूण संपत्ती ११,०७,५८,३३,१९० रुपये आहे. यातील ७,०८,३३,१९० रुपये चल संपत्ती आहे.

देशातील सर्वात श्रीमंत पहिल्या पाच उमेदवारांपैंकी रमेश शर्मा एकमेव अपक्ष उमेदवार आहेत. इतर चार उमेदवार काँग्रेसचे आहेत. यामध्ये तेलंगनातून चेवेल्लातून काँग्रेस उमेदवार कोंडा विशेश्वर रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे एकूण ८९५ करोड रुपयांची संपत्ती आहेत. 

तर मध्यप्रदेशातून छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढणारे काँग्रेस उमेदवार नकुल नाथ हे तिसऱ्या क्रमांकावरचे उमेदवार आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६६० करोड रुपये आहे. 

संपत्तीच्या बाबतीत तामिळनाडूमधून कन्याकुमारी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतकुमार एच. चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे ४१७ करोड रुपयांची संपत्ती आहे. तर मध्यप्रदेशातील गुना मतदारसंघातून निवडणूक लढणारे ज्योतिरादित्य सिंधिया ३७४ करोड रुपयांसोबत पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.